Baner News : जलसंवर्धनाच्या क्षेत्रातील शाश्वत कार्यासाठी कौशल्याधारीत मनुष्यबळ गरजेचे – डॉ. नितीन करमाळकर

एमपीसी न्यूज –  पाणी हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. आज जेव्हा आपण जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन या विषयांवर बोलतो तेव्हा आपल्या पूर्वजांनी यासंदर्भात वापरलेल्या पद्धती व केलेले उपाय यांचा विसर आपल्याला पडला असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मात्र आजच्या काळात जलसंवर्धनाच्या क्षेत्रात शाश्वत कार्य करावयाचे असल्यास कौशल्याधारीत (Baner News) मनुष्यबळ गरजेचे असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ  नितीन करमाळकर यांनी केले.

 

 

सेवावर्धिनी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या जलदूत 2.0 या जलसंधारणातील पथदर्शी उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आज बाणेर रस्त्यावरील यशदा येथील सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. सेवावर्धिनी संस्थेचे सचिव सोमदत्त पटवर्धन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यशदाच्या जल साक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, जलदूत या संपूर्ण प्रकल्पाला आर्थिक मदत करणाऱ्या अॅटलास कॉप्को कंपनीचे कॉर्पोरेट एचआर प्रमुख कबीर गायकवाड, कंपनीच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) विभागाचे व्यवस्थापक अभिजित पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

 

 

Chakan News : चाकणमध्ये 22 हजार पोती कांद्याची आवक

 

 

‘जलदूत’ हा सेवावर्धिनीचा जल संधारणातील एक पथदर्शी प्रकल्प असून गेली 13 वर्षे संस्था संपूर्ण राज्यभरात 25 गावांमध्ये जलसंधारण क्षेत्रात कार्यरत आहे. 2015 ते 17  या काळात संस्थेच्या वतीने जलदूत 1 तर 2019 ते 23 या कालावधीमध्ये जलदूत 2.0 हे दोन्ही प्रकल्प अॅटलास कॉप्को या कंपनीच्या सक्रीय व आर्थिक सहभागाने संपन्न झाले. जलदूत 2.0 प्रकल्पात तब्बल 21 सहयोगी संस्था सहभागी झाल्या होत्या याशिवाय एकूण 3 विद्यापीठे, विविध शासकीय आस्थापनांचा सहभाग हे जलदूत 2.0 चे खास वैशिष्ट्य होते.

 

 

याबरोबरच हरिदास राऊत, कृष्णा राऊत मुरूमहाटी, ता त्रिंबक, जि नाशिक (प्रथम क्रंमाक), योगेश गावित, अजित गावित रगतविहिर, ता सुरगणा, जि नाशिक (द्वितीय क्रमांक), मधुकर गागरे, किरण सूर्यवंशी कानडगाव, ता राहुरी जि अहमदनगर (तृतीय क्रमांक) या जलदूतांनी त्याच्या गावांमध्ये केलेल्या कार्याचा सन्मान करीत त्यांना पारितोषिके देण्यात आली. तर वनवासी कल्याण आश्रम, नाशिक (प्रथम क्रमांक), संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, नांदेड (द्वितीय क्रमांक),  नवी उमेद, पांढरकवडा, यवतमाळ (तृतीय क्रमांक) या स्वयंसेवी संस्थांना देखील गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकास दीड लाख, द्वितीय क्रमांकास 1 लाख तर तृतीय क्रमांकास 75 हजार रुपयांचा धनादेश देत या वेळी गौरविले गेले.

 

 

सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर हर्षन पाटील (Baner News) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सोमदत्त पटवर्धन यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.