IPL 2021 : बातमी आयपीएलची : बेंगलोर संघाचा सलग  विजयांचा चौकार

देवदत्त पडीकलने शतक मारत स्वतःला केले सिद्ध

0

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या दिवसरात्रीच्या या सामन्यात विराट कोहलीला जणू मिडास टच लाभला होता ,नाणेफेक जिंकण्यापासून, गोलंदाजीतल्या, क्षेत्ररक्षणातल्या प्रत्येक बदलात त्याने आज विराट यश मिळवले.

नाणेफेक जिंकून त्याने संजू सॅमसनच्या रॉयल राजस्थान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि तिसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने खतरनाक जोस बटलरला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. पाठोपाठ जेम्मीसनने मनन व्होराला तंबूत पाठवून राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का दिला.

आपल्या पहिल्याच कर्णधारपदाच्या सामन्यात शतक ठोकून जोरदार सुरुवात करणाऱ्या संजू सॅमसनला त्यानंतर अजुनतरी ते सातत्य ठेवण्यात यश आलेले नाही. आज त्याने सामन्यातला सर्वात लांब षटकार मारला खरा पण तो केवळ 21 धावा काढून लगेचच बाद झाला. पाठोपाठ डेव्हीड मिलर सुद्धा भोपळा न फोडता सिराजचा शिकार झाला.

_MPC_DIR_MPU_II

ऑस्ट्रेलियन दौऱ्यातल्या यशामुळे आत्मविश्वास ज्याचा कमालीचा वाढला आहे त्या अत्यंत सामान्य घरातुन कोणत्याही वशिल्याशिवाय अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सिराजचे भवितव्य का उज्ज्वल आहे असे मोठमोठे समालोचक म्हणतात त्याची प्रचिती देणारी गोलंदाजी सिराज ने आज केली. केवळ 27 धावा देत तीन बळी मिळवले.

चार गडी बाद 43 अशी बिकट अवस्था असताना शिवम दुबे आणि रियान पराग यांनी काही आकर्षक फटके मारत अर्धशतकी भागीदारी जोडली मात्र याचवेळी बऱ्यापैकी खेळत असलेला रियान पराग बाद झाला. युवराज सिंग ची झलक ज्याच्यामध्ये दिसते असे म्हणतात त्या शिवम दुबेनी 46 धावा करताना काही नेत्रदीपक फटके मारले पण जम बसल्यानंतर सुद्धा तो मधावग वाढवण्याच्या नादात बाद झाला.

यानंतर राहुल तेवतीयाने जलदगतीने 40 धावा फटकावत संघाला 177 धावांपर्यंत पोहचवले. बेंगलोर काढून सिराजला हर्षल पटेलने सुद्धा तीन बळी मिळवून चांगली साथ दिली, पटेल अजूनही सर्वात जास्त बळी मिळवून पर्पल कॅपचा मानकरी म्हणून कायम आहे.

178 धावांचा पाठलाग करताना कोहली व देवदत्त पडीकलने स्वप्नवत फलंदाजी करत संघाला दहा विकेट्स राखून सोळाव्या षटकातच विजय मिळवून दिला. सुरुवातीला म्हणावे तशी कामगिरी न करणाऱ्या देवदत्त पडीकलवर कोहलीने ठाम भरोसा दाखवला आणि त्यावर खरे उतरून देवदत्तने आपल्या कर्णधाराला आज शतकी भेट आणि सलग चौथा विजय मिळवून देताना मोलाची कामगिरी केली. आपल्या शतकी खेळीला त्याने केवळ 52 चेंडूत सजवताना अकरा चौकार आणि सहा उत्तुंग षटकारांची आतिषबाजी केली.

तर कर्णधार विराटने सुद्धा 47 चेंडूत नाबाद 72 धावा करत आपल्या आयपीएल मधल्या सहा हजार धावा सुद्धा पूर्ण केल्या. आतापर्यंत आयपीएल मध्ये जबरी खेळाडू असूनही विजेतेपद न मिळवू शकल्यची खंत विराटला  आहे, ती यावेळी तरी अजिंक्यपद मिळवून त्याला दूर करायची आहे आणि त्याच दृष्टीने त्याची वाटचाल चालु आहे. आता यात तो यशस्वी ठरणार का याचे उत्तर काळच देईल पण आजच्या सलग चौथ्या विजयाने कोहली आणि कम्पनीची छाती नक्कीच फुगली असेल. आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण करणारा देवदत्त पडीकलच सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment