Alandi : आळंदीत बँक कर्मचा-याला पितापुत्राकडून धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – कर्ज खाते (लोन अकाउंट) उघडण्यासाठी सुरुवातीला बचत खाते असणे आवश्यक आहे. असे सांगत बचत खात्याचा फॉर्म भरून देण्यासाठी मदत करणा-या बँक कर्मचा-याला पितापुत्राने धक्काबुक्की केल्याचा प्रकार आळंदी येथील कॉर्पोरेशन बँकेत मंगळवारी (दि. 15) दुपारी तीनच्या सुमारास घडला.

याप्रकरणी मंदार दिलीप गाढवे (वय 32, रा. च-होली बुद्रुक) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजाराम पोपट लोखंडे, पोपट लोखंडे (दोघे रा. मरकळ) या पितापुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी मंदार कार्पोरेशन बँकेच्या आळंदी शाखेत कर्मचारी म्हणून काम करत आहेत. संशयित आरोपी राजाराम याला बँकेत कर्ज खाते सुरु करायचे होते. त्याबाबत बँकेच्या व्यवस्थापक वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, कर्ज खाते उघडण्यापूर्वी खातेदाराची बचत खाते बँकेत असणे आवश्यक आहे. त्यामुळे फिर्यादी मंदार त्यांना बचत खात्याचा फॉर्म भरून देतो असे म्हणाले. यावरून राजाराम याने रागात येऊन मंदार यांना शिवीगाळ आणि दमदाटी करत ‘तुला माझ्याकडून कर्जसाठी लाच पाहिजे’ असे म्हणत उद्धट वर्तन केले. राजाराम याचे वडील पोपट यांनीही मंदार यांना शिवीगाळ करत मारण्यासाठी चप्पल उगारली. यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.