Pune Crime News : पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले, लाखो रुपये लंपास

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील यवत गावी बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. यवत पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये हा प्रकार घडला. चोरट्यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडलं.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, यवत येथील पुणे-सोलापूर महामार्गालगत हे बँक ऑफ महाराष्ट्रचं एटीएम होतं. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे या ठिकाणी आहे. गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी एटीएम पुरलं आणि आपली रक्कम चोरून नेली. प्राथमिक माहितीनुसार एटीएम मध्ये वीस लाख रुपयांहून अधिक रक्कम होती. यातील बहुतांश रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. परंतु काही रक्कम त्यांना काढता न आल्याने ती तशीच राहिली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यापूर्वीही एटीएम मशीनची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यापूर्वी यवत मध्ये महामार्गालगत असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम मशीनची चोरी झाले होते. ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.