Pune News: महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव राजू नरपांडे यांनी काढले आहेत. राज्य सरकारने अनास्कर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला असून या परिषदेचा कार्यकाल 6 ऑगस्ट 21 पासून तीन वर्षे अथवा पुढील आदेश होईपर्यंत राहील.

राज्य सरकारने सहकार परिषदेची नव्याने पुनर्रचना केली आहे. विद्याधर अनास्कर यांची अध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. सहकारी चळवळीशी संबंधित अशा सर्व बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे. सहकारी चळवळीचा आढावा घेणे व राज्यातील सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचविणे. सहकारी संस्थांना येणा-या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग व उपाय सुचविणे. राज्य शासन, परिषदेकडे निर्देशित करील अशा सर्व बाबींवर राज्य शासनाला अहवाल देणे.

राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना व धोरणे यांची शिफारस करणे. विशेषतः समाजातील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग यांच्या विकासासाठी असलेल्या सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी असलेल्या विद्यमान परियोजनांचे मुल्यांकन करणे व नवीन परियोजना सुचविणे.  सहकारी पध्दतीद्वारे आर्थिक विकास करण्याच्या विशेष परियोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला सल्ला देणे आणि विभागामार्फत किंवा खास स्थापन केलेल्या मंडळामार्फत उपरोक्त कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास करण्याचे काम हाती घेणे असे कामकाज त्यांना करता येणार आहे.

विद्याधर अनास्कर हे उच्चशिक्षित आहेत. गेल्या 30 वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर प्रशासक, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्सचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी सध्या ते कार्यरत आहेत. पुण्यातील विद्या सहकारी बँकेचे ते कार्यवाहक संचालक, रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर राज्याचे सदस्य आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सल्लागार समितीचे ते गेल्या 12 वर्षांपासून सदस्य आहेत.

बँकिंग विषयावर त्यांची आजपर्यंत आठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सामान्य जनतेला बँकिंगविषयक मोफत सल्ला देण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.