Pune: सत्तेचा इतका माज बरा नव्हे, सत्ताधारी भाजपविरोधात पुण्यात बॅनरबाजी

Banner against BJP in Pune for jumbo hospital ज्या पुणेकरांच्या 'जिवावर' सत्ता मिळवली, त्यांचाच जीव घ्यायला निघालात? हॉस्पिटल बांधायला पैसे देणार नाही म्हणता? सत्तेचा इतका माज बरा नव्हे! ही मस्ती जिरवली जाईल

एमपीसी न्यूज – ज्या पुणेकरांच्या ‘जिवावर’ सत्ता मिळवली, त्यांचाच जीव घ्यायला निघालात? हॉस्पिटल बांधायला पैसे देणार नाही म्हणता? सत्तेचा इतका माज बरा नव्हे! ही मस्ती जिरवली जाईल, घोडा – मैदान जवळच आहे! अशा प्रकारचा निनावी बॅनर लावून भाजपला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इशारा देण्यात आला आहे.

पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शहरात जोरदार बॅनरबाजी दिसून येत आहे. पुण्यातील गुडलक चौकात भाजपचा खरपूस समचार घेणारा एक बॅनर लावण्यात आला आहे.

तर, दर्जेदार सुविधांनी युक्त असलेले सर्वसमान्य पुणेकरांसाठीचे सुमारे 1 हजार खाटांचे स्व. नानाजी देशमुख रुग्णालय लवकरच उभारण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात तशी तरतूदही करण्यात आली आहे.

राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून कर्जस्वरुपात निधी उपलब्ध करुन लवकरच हे रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल.

जंबो हॉस्पिटलबाबत असलेली जबाबदारी पुणे मनपा सर्वतोपरी पार पाडेल, असे सांगत शहरात गेले ४ महिने महापालिकेकडून सातत्याने कोरोना नियंत्रणासाठी काम केले जात असून मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी विनंती पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली आहे.

शहरात गेले 4 महिने महापालिकेकडून सातत्याने कोरोना नियंत्रणासाठी काम केले जात असून त्यावर आत्तापर्यंत 250 ते 300 कोटींचा खर्च झाला आहे. पुण्यामध्ये ऑगस्ट महिन्यात कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा 2 लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी गंभीर कोरोनाग्रस्त रूग्णांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नाही. जंबो हॉस्पीटल हे पुणेकरांसाठीच असल्याने त्यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करणार असून आवश्यक निधी स्थायी समितीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेने आधीच शहरातील कोरोनाग्रस्तांसाठी अडीचशे कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे पालिकेस ही साथ आटोक्यात येईपर्यंत आणखी खर्च करावा लागणार आहे.

त्यातच, लॉकडाऊनमुळे महापालिकेचे उत्पन्नही घटलेले आहे. शहरातील कोरोना नियंत्रनचा कोणताही खर्च पालिकेने थांबविलेला नाही. तसेच थांबवणारही नाही. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती आणि कोरोना नियंत्रणाचे काम पाहता राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.