Innovative: पठारे कुटुंबीयांच्या घरी वर्तमानपत्रांच्या रोलपासून बनवलेल्या मखरात बाप्पा झाले विराजमान

टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेनुसार त्यांनी यंदा ही पर्यावरणपूरक सजावट केली आहे. याशिवाय चमचम वापरण्याऐवजी त्यांनी मण्यांचा वापर केला आहे.

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) – गणपतीच्या सजावटीसाठी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. त्यात वैविध्य, नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतो. अशाच प्रकारे टाकाऊ वस्तूंपासून गणपतीची सजावट करण्याची कल्पना अक्षय पठारे यांना यंदा सुचली. त्यांनी ती अंमलात देखील आणली. वर्तमानपत्रांचे रोल, फुकट गेलेले पुठ्ठे यांच्यापासून मखर करुन त्याची सजावट करुन त्यांनी त्यामध्ये गणपतीबाप्पांची यंदा स्थापना केली.

दरवर्षी सजावटीसाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणा-या अक्षय यांना वर्तमानपत्रांचे रोल करण्याची आयडिया आली. त्या रोलचे मखराचे खांब त्यांनी बनवले आहेत. तसेच वापरलेल्या खोक्यांचे पुठ्ठेदेखील त्यांनी या सजावटीत वापरले आहेत.

टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेनुसार त्यांनी यंदा ही पर्यावरणपूरक सजावट केली आहे. याशिवाय चमचम वापरण्याऐवजी त्यांनी मण्यांचा वापर केला आहे. जेणेकरुन पर्यावरणपूरक सजावटीमध्ये कोणतीही कमतरता राहू नये.

गणपती स्थापनेच्या सुमारे दहा दिवस आधीपासून अक्षय यांनी कामाला सुरुवात केली. त्यांचा स्वतःचा गणपती विक्रीचा स्टॉल असतो. त्यामुळे तो सांभाळून दररोज थोडी थोडी तयारी ते करत होते. गणपतीची मूर्ती दोन ते अडीच फुटांची आहे. तीदेखील त्यांच्या मित्रानेच तयार केली आहे.

तसेच गणपतीचा फेटा, शाल देखील अक्षय यांनी साडीच्या काठापासून तयार केला आहे. वर्तमानपत्राचे रोल तयार केले, ते एकमेकांना चिकटवले आणि त्यापासून नक्षीदार खिडकी, खांब असे मखर अक्षय यांनी तयार केले. आणि नंतर त्याला ब्रशनेच रंग दिला. हे सगळे इतके बेमालूम झाले आहे की ते पेपरचे आहे असे वाटतच नाही. अशाच सगळ्यांकडून प्रतिक्रिया मिळाल्या, असे अक्षय यांनी आवर्जून सांगितले.

हे पुठ्ठा किंवा पेपरपासून तयार केले आहे हे सांगावे लागत आहे. आणि त्यावर लोकांचा विश्वास बसत नसल्याने ते चक्क हात लावून त्याची खात्री करुन घेतात.

_MPC_DIR_MPU_II

अक्षय यांच्या पत्नी श्रुती या मोडी लिपीच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांनी 121 वेळा जय गणेश असे लिहून गणपतीची आकृती रेखाटली आहे. घरातील सर्वानीच याकामी मदत केली आहे. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा यात उचलला आहे. अक्षय यांच्यासह त्यांची पत्नी श्रुती, वडील पांडुरंग पठारे, आई रुक्मिणी, भाऊ शुभम पठारे आणि बहीण ऋतुजा पवार यांची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे.

मनात भाव असला की तेथे देव दिसतो असे म्हणतात, ते खोटे नाही याची प्रचिती हे असे कलाकार बघितले की नक्कीच येते. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी पठारे कुटुंबीयांच्या गणपतीबाप्पाचे विसर्जन होणार आहे. यंदाचा गणेशोत्सव सुनासुनाच गेला. पुढच्या वर्षी ही सगळी संकटे टळोत आणि धुमधडाक्यात गणपतीबाप्पांचे स्वागत करता येवो ही त्याच्या चरणी प्रार्थना.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.