Baramati Crime : सातारा व सांगली येथे विक्रीसाठी आंध्रप्रदेशातून आणलेला 312 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – आंध्र प्रदेशमधून सातारा व सांगली येथे विक्रीसाठी आणलेला 312 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. बारामती पोलिसांनी सोमवारी (दि.21) रात्री ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी विजय जालिंदर कणसे (वय 26, रा. कडेगांव, जि. सांगली) विशाल मनोहर राठोड (वय 19, रा. विटा, ता, खानापूर, जि. सांगली) निलेश तानाजी चव्हाण (वय 32, रा. ता. माण, जि. सातारा) योगेश शिवाजी भगत (वय 22, रा. शिर्सूफळ, ता. बारामती, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आंध्रप्रदेशमधून आणलेला गांजा विक्रीसाठी सातारा व सांगली येथे बारामती मार्गे घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती बारामती पोलिसांनी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन टिम बनवुन मोठा पाऊस सुरू असतानाही पाटस व भिगवण रोडने येणा-या वाहनांची कसून तपासणी सुरू केली. त्यावेळी रात्री तीनच्या सुमारास पाटसकडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने टेम्पो न थांबवता बारामती दिशेने वेगात पळवला. संशय आल्याने पथकाने सरकारी वाहन व खाजगी कार मधून टेम्पोचा पाठलाग करून ब-हाणपुर फाटा येथे टेम्पोच्या आडवी गाडी उभी करुन एमएच 10 सीआर 4326 या टम्पोला अडवले.

टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 46 लाख रूपये किमतीचा 312 किलो गांजा मिळाला. आरोपींनी हा गांजा विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथून आणला असून तो विक्रीसाठी सातारा व सांगली येथे घेऊन जात असल्याची कबुली दिली. गांजा जप्त करुन चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.