Baramati Crime News : 88 हजारांच्या चंदनसाठ्यासह चंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

एमपीसीन्यूज : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात 88 हजारांच्या चंदनसाठ्यासह एका चंदन तस्कराला पोलिसांनी जेरबंद केले. माळेगाव खुर्द (ता.बारामती) येथे आज, बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

सोमा सदाशिव गव्हाणे (वय 45), असे अटक आरोपीचे नाव आहे. पुणे जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

त्यावेळी माळेगाव खुर्द (ता.बारामती) येथे एक इसम चंदनाची लाकडे विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता आरोपी सोमा गव्हाणे चंदनाच्या लाकडासह आढळून आला.

पोलिसांना पाहून तो चंदनाची लाकडे तिथेच टाकून पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत 88  हजार पाचशे रुपयांची चंदनाची लाकडे जप्त केली. आरोपीसह जप्त केलेला मुद्देमाल बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला.

आरोपीेविरूध्द भा.दं.वि.कलम 379, भारतीय वन अधिनियम 1927चे कलम26, 41, 42 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, प्रमोद नवले, पोलीस नाईक विजय कांचन, शिपाई धीरज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.