Baramati Crime News : बनावट‌ ‘रेमडेसिवीर’ची विक्री करणारी टोळी बारामतीत जेरबंद; चौघे गजाआड

एमपीसीन्यूज : रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने ‘रेमडेसिवीर’च्या ‌ रिकाम्या बाटलीमध्ये इंजेक्शन सिंरीजद्वारे पॅरासिटामाॅल औषध भरुन त्याची चढ्या दराने विक्री करून गरजू रुग्ण आणि आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक करुन गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे.

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पत्रकार ‌परिषदेत याबाबतची माहिती दिली.

दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय 35), शंकर दादा भिसे (दोघे रा.काटेवाडी, ता.बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता.इंदापूर) प्रशांत सिद्धेश्वर घरत (वय 23, रा. भवानीनगर, ता. इंदापूर), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

राज्यभरासह पुणे जिल्हा आणि बारामती शहर परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. तसेच रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पोलिसांना रेमडेसिवीरचा काळाबाजार आढळून आल्यास चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या पार्श्वभूमीवर बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश‌ ढवाण व सहाय्यक पोलिस निरीक्षक विधाते यांनी परिसरात चौकशी सुरु केली होती. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक विधाते यांना एक व्यक्ती 35 हजार रुपयाला रेमडेसिवीर इंजेक्शन विकत असल्याची माहिती मिळाली. विधाते यांनी त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मिळविला.

तसेच संबंधित व्यक्तीला फोन करून दोन इंजेक्शन विकत मागितले. तसेच या इंजेक्शनची किंमत 70 हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानुसार शनिवारी (दि. 17) रात्री साडेबारा वाजता संबंधित व्यक्ती फॉर्च्युन गाडीतून बारामती शहरातील पेन्सिल चौक या ठिकाणी आला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.

चौकशीत संबंधित व्यक्तीचे नाव प्रशांत घरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासोबत शंकर दादा भिसे हाही होता. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे बनावट रेमडेसिवीरच्या तीन बाटल्या आढळून आल्या.

दरम्यान, या रॅकेटचा सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड तसेच संदीप संजय गायकवाड यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. संदीप गायकवाड हा वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये काम करत होता. तो रेमडेसिवीरच्या ‌ रिकाम्या बाटल्या आणून त्यात पॅरासिटामाॅल औषध भरून ते औषध मुख्य सूत्रधार दिलीप गायकवाड याला दहा हजार रुपयाला देत होता. त्यानंतर दिलीप गायकवाड हा प्रशांत घरत व शंकर भिसे यांच्यामार्फत ते गरजूंना 35 हजार रुपयांना विकत होता.

पोलीस अधीक्षकांकडून 25 हजारांचे बक्षीस

बनावट रेमिडिसीवीर विक्रीचा पर्दाफाश करणाऱ्या बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पथकाला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यावतीने 25  हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पथकाचे मनोधर्य उंचावले आहे.

अटक  आरोपींविरोधात भादवि कलम 420, जीवनावश्यक अधिनियम व औषधे सौंदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे का, याची माहिती घेण्यासाठी तीन पथकामार्फत चौकशी सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.

प्रशासनाच्या माध्यमातून रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात आहे. त्यामुळे गरजूंनी काळाबाजाराने इंजेक्शन विकत घेऊ नये. कोणी काळाबाजाराने औषध विकत असेल तर त्याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. काळाबाजाराने इंजेक्शन विकणारा  आणि ते खरेदी करणारा अशा  दोघांवरही कारवाई केली जाईल. नारायण शिरगावकर : उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.