Baramati News : राज्यातील प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभारावेत ; खासदार सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – भारताच्या संविधानाप्रती ( Constitution) जागरुकता निर्माण व्हावी. भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या भावनेतून बारामती लोकसभा ( Baramati Loksabha) मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकेच्या क्षेत्रात संविधान स्तंभ उभारले आहेत. हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून तो राज्यभरात राबविण्याची आवश्यकता असल्याचे खासदार सुप्रिया सुळे ( Mp Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

याबाबत खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( chief Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत विचार करावा, अशी विनंती केली आहे.

खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘भारतीय संविधानाची निर्मिती भारतरन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय स्वातंत्र्य व समता चळवळीच्या मंथनातून पुढे आलेल्या मूल्यांवर करण्यात आली. भारतीय समाजाने स्वतःसाठी घेतलेली ही शपथ आहे. त्याचे स्मरण सर्वांनी करुन भविष्यातील वाटचालीची दिशा निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.’

‘प्रत्येक भारतीयाने राज्यघटनेच्या न्याय , स्वातंत्र , समता व बंधुता या मुल्यांचे पालन करणे हे कर्तव्य आहे. तरच सक्षम आणि सुजाण भारतीय नागरिक तयार होऊ शकेल. म्हणून मी माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेसह संविधान स्तंभांची उभारणी केली आहे.’

‘महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय किंवा निमशासकीय जागेची निवड करुन, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेसह स्तंभांची उभारणी करावी’, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.