Baramati News : कृषीपंप वीज बिल थकबाकी वसूल केल्यास साखर कारखान्यांना मिळणार 10 टक्के रक्कम

एमपीसी न्यूज: विविध प्रकारच्या शेतकरी सहकारी संस्था व सहकारी साखर कारखान्यांमार्फत कृषीपंपांच्या वीज बिलांची वसूली झाली तर वसूलीतील रकमेच्या 10 टक्के रक्कम संबंधित कारखान्याला देण्यात येणार असल्याचे महावितरणाने सांगितले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी या वसूलीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.

माळेगाव येथील सहकारी कारखान्यामध्ये काल ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या वसुली योजनेची सविस्तर माहिती महावितरण, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी माळेगाव सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळापुढे दिली. यावेळेस कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, व्हाईस चेअरमन तानाजी कोकरे, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप तसेच महावितरणाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे व या प्रणालीचे विश्लेषक रमेश चव्हाण उपस्थित होते.

साखर कारखान्यांना ही थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या संगणकावर महावितरणाचे सॉफ्टवेअर व बिलींग कोड देण्यात येणार आहे.

कृषी धोरण २०२०’ नुसार जे शेतकरी या योजनेत सहभागी होणार आहेत, त्यांच्या थकबाकीचे पुर्न:गठण करून त्यातील दंड व व्याज माफ करुन, निव्वळ थकबाकी निश्चित करण्यात आली आहे. प्रथम वर्षी निव्वळ थकबाकीच्या फक्त 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 50 टक्के थकबाकी माफ होईल. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी योजनेच्या काळातील सर्व चालू बिले नियमित भरणे आवश्यक आहे.

महावितरणाने शेतकऱ्यांना त्यांच्या थकबाकीची रक्क्म जाणून घेण्यासाठी ही https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/app लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर कृषीपंपाचा 12 अंकी ग्राहक क्रमांक टाकल्यास संपूर्ण थकबाकीची माहिती उपलब्ध होणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावर वसूली झाल्यास ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील विद्युत कामे करण्यासाठी ३० टक्के रक्कम राखीव ठेवली जाणार असल्याने अनेक ग्रामपंचायतीही वसूलीसाठी पुढे येऊन सहकार्य करत आहेत. तसेच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना ही प्रोत्साहन स्वरुपात लाभांश मिळणार असल्याने, योजनेला गती मिळत असून घरोघरी याचा प्रचार केला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.