Baramati News : लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका

एमपीसीन्यूज : प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज, शनिवारी येथे केले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक’ झाली. यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्या मार्फत विविध उपाययोजना करून देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही बाब चिंतेची असून कोरोना साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भीयाने घेणे आवश्यक आहे. बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट प्राधान्याने करून घेण्यात यावे. प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.

सांगली जिल्ह्यात मोबाईल कोरोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची कोरोनाची तपासणी केली जाते, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्यात यावी. रूग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे. बारामती तालुक्यातील वृध्दाश्रमामध्ये जावून तेथील वृध्दांची व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. आरोग्यसेवेकरीता मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घेण्यात याव्यात.

कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्री याची कमतरता भासल्यास औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांची मदत घ्यावी. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले असतानादेखील नागरिकांकडून निर्बंधांचे पालन केले जात नाही, हे योग्य नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.