Baramati : ईडीच्या कारवाई विरोधात बारामतीमध्ये कडकडीत बंद

एमपीसी न्यूज – शिखर बँक घोटाळा प्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे पडसाद उमटले असून बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पुण्यात देखील मंडईच्या टिळक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

बारामती शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे. शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले असून बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार करू नये असे आवाहन राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले आहे.

पुण्यात मंडई परिसरात ‘शरद पवार जिंदाबाद’, ‘फडणवीस सरकार हाय हाय, भाजप सरकार हाय हाय’, आशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील कारवाईचा निषेध केला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महात्मा फुले मंडई पोलीस चौकीत घुसले. बुधवारी पावणे अकराच्या सुमारास हे आक्रमक आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, शहराध्यक्ष चेतन तुपे, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, स्वप्नील दुधाने, विजय डाकले, बाबा धुमाळ सहभागी झाले होते.

चेतन तुपे म्हणाले, “शरद पवार कधीही बँकेचे संचालक नव्हते. भाजप रडीचा डाव खेळतय. पवार यांच्या राजकीय सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा पायाखालची वाळू घसरायला लागली आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.