Maval : दत्तक घेतलेल्या खोपटेगावात जाऊन उघड्या डोळ्याने विकास बघा, मगच बोला – श्रीरंग बारणे

पार्थ पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर आपण उरण तालुक्यातील खोपटे गाव दत्तक घेतले. त्यानंतर खोपटे गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. गावात रस्ते, लाईट, ड्रेनेज, मुख्य रस्त्याला पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, खासदार निधीतून बांधलेले बांधपाडा समाज मंदिर, प्राथमिक शाळेत संगणक, सर्व प्रकारचे शासकीय दाखले मिळत आहे. त्यामुळे विरोधकांनी दत्तक घेतलेल्या गावात जाऊन अगोदर विकास पहावा, मगच बोलावे असे जोरदार प्रत्युत्तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे.

शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना त्यांनी स्वतः दत्तक घेतलेल्या खोपटे गावाचा विकास करता आला नाही. तर ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली होती. त्याला बारणे यांनी आज (बुधवारी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

बारणे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आपण उरण तालुक्यातील खोपटेगाव दत्तक घेतले. मागील पाच वर्षात गावाचा कायापालट केला. खोपटे गावामध्ये रस्ते, लाईट, ड्रेनेजची व्यवस्था केली. मुख्य रस्त्याला पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, खासदार निधीतून प्रशस्त असे बांधपाडा समाज मंदिर बांधले आहे. तळ्याचे सुशोभिकरण केले. स्मशानभूमीचे काम पुर्ण झाले आहे”

प्राथमिक शाळेत संगणक, सर्व प्रकारचे शासकीय दाखले ऑनलाईन मिळत आहे. गाव 100 टक्केमध्ये हगणदारीमुक्त झाले आहे. त्याचबरोबर बस स्टॉपच्या कामास मंजुरी मिळाली आहे. दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करुन दाखविला आहे. त्यामुळे विरोधकांनी अगोदर दत्तक घेतलेल्या गावात जाऊन विकास पहावा, त्यानंतरच बोलावे. कोणी तरी सांगितले म्हणून अर्धवट माहितीच्या आधारे बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे विरोधकांनी माहिती घेऊन बोलावे, असा सल्लाही बारणे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.