Baroda News : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथील सरकारी अधिकाऱ्यांसाठी टाटाकडून दहा इलेक्ट्रिक नेक्सॉन 

एमपीसी न्यूज – गुजरात सरकारच्या स्वच्छ आणि हरित पर्यावरण मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून, टाटा मोटर्सने दहा इलेक्ट्रिक नेक्सॉन कार गुजरात सरकारला हस्तांतरित केल्या आहेत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे कार्यरत असलेल्या सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी या कारचा वापर केला जाणार आहे. 

उद्योग आणि खाणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजीव कुमार गुप्ता व सरदार सरोवर नर्मदा निगम, एमडी जीओजी यांच्या उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातमध्ये 182 मीटर (597 फूट) उंच पुतळा उभारण्यात आला आहे. जगातील सर्वांत उंच असणारा हा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जातो. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दुप्पट आणि चीनच्या स्प्रिंग टेम्पल बुद्धापेक्षा 29 मीटर उंच हा पुतळा आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याची रचना प्रसिद्ध भारतीय शिल्पकार राम व्ही. सुतार यांनी केली असून पुतळा उभारण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी सक्रिय भूमिका बजावत आहे. टाटा युनिव्हर्स ईव्ही इकोसिस्टमद्वारे ईव्हीचा वेगाने वापर वाढविण्यासाठी टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ऑटो कॉम्पोनेन्टस्, टाटा मोटर्स फायनान्स आणि क्रोमासह इतर टाटा समूहाच्या कंपनी काम करत आहेत.

टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारबाबत ग्राहकांच्या वाढत्या गरजा सातत्याने पूर्ण केल्या आहेत. यामध्ये टाटाची नेक्सॉन EV सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. देशात सध्या सहा हजार पेक्षा जास्त नेक्सॉन EV रस्त्यावर धावत असून, या मॉडेलचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.