Barshi : पतीला डबा देऊन घरी जाणारी महिला बेपत्ता

एमपीसी न्यूज – पतीचा जेवणाचा डबा दिल्यानंतर घरी जाणारी महिला बेपत्ता झाली. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी सुभाषनगर, बार्शी येथे घडली.

सुलोचना वैजिनाथ घोंगडे (वय 48, रा. सुभाषनगर, बार्शी, जि. सोलापूर) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वैजिनाथ सोमनाथ घोंगडे (वय 61) यांनी बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजिनाथ यांचा पानटपरीचा व्यवसाय आहे. बार्शी येथे ताडसौंदणे रोडवर त्यांची पानटपरी आहे. वैजिनाथ यांना तीन मुले असून तिघेही कामानिमित्त पुण्यात असतात. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वैजिनाथ पानटपरी उघडण्यासाठी गेले. सकाळी दहाच्या सुमारास सुलोचना या वैजिनाथ यांचा जेवणाचा डबा घेऊन गेल्या. वैजिनाथ यांचा डबा देऊन त्या घरी जाते म्हणून निघाल्या.

रात्री साडेनऊच्या सुमारास वैजिनाथ पानटपरी बंद करून घरी गेले. त्यावेळी सुलोचना घरी नसल्याचे त्यांना दिसले. वैजिनाथ यांनी आजूबाजूला चौकशी केली. शहरातील विविध ठिकाणी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली असता सुलोचना मिळून आल्या नाहीत. याबाबत वैजिनाथ यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.

सुलोचना यांची उंची पाच फूट आहे. नाक सरळ, केस काळे-पांढरे, चष्मा, रंग सावळा, अंगाने जाड असून गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या आहेत. मराठी भाषा बोलता येते. वरील वर्णनाच्या महिलेविषयी माहिती मिळाल्यास पोलिसांशी तसेच वैभव घोंगडे (9561718991), रोहित घोंगडे (9096913194), विशाल घोंगडे (9689590659) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.