Akurdi News : अपघात घडल्यास आयुक्तांवर गुन्हा दाखल करू; शिवसेना शहर संघटकाचा इशारा

एमपीसी न्यूज – आकुर्डी गावात मुख्य रस्त्याचे काम चालू आहे. रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर निकृष्ट कामामुळे संपूर्ण रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या टायरमुळे खडीचे दगड उडून पायी चालणाऱ्या नागरिकांना लागत आहेत. शिवाय रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या काचांवरही हे दगड लागून नुकसान होत आहे. खडीमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शहर संघटक बशीर सुतार यांनी दिला आहे.

याबाबत सुतार यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत आकुर्डी येथील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तसेच रस्त्यावर खडी पसरल्यामुळे होत असलेल्या गैरसोईबाबत लेखी तक्रार केली. यावेळी शिवसेना विभागप्रमुख पार्थ गुरव, उपविभागप्रमुख विकास भिसे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, आकुर्डी गावात मुख्य रस्त्याचे काम चालू आहे. रस्त्यावर लावलेल्या चेंबरच्या जाळ्या दोन दिवसांत तुटतात आणि अपघात होतात. रस्त्यावर खड्डे आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे सुद्धा मुश्कील झाले आहे. रस्त्यावर खडीचे साम्राज्य पसरलेले आहे.

रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर निकृष्ट कामामुळे संपूर्ण रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या टायरमुळे खडीचे दगड उडून पायी चालणाऱ्या नागरिकांना लागत आहेत.शिवाय रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या काचांवरही हे दगड लागून नुकसान होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक व व्यापारी प्रचंड त्रस्त झाले आहेत. नियमित कर भरून महापालिकेकडून शिक्षा मिळत असल्याची भावना नागरिक व व्यापारी व्यक्त करीत आहेत.

कामाचा दर्जा पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नाही?

रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेता यांनाही या खडीचा त्रास होत आहे. दुकानातील व्यापारींना सुद्धा हे खडे जोरात लागतात. रस्त्याचे काम करणारा ठेकेदार कसे काम करतो हे पाहण्यासाठी महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला वेळ मिळत नाही का? नागरिकांच्या कररूपी पैशातून पगार घेताना जबाबदार अधिकाऱ्यांना शरम कशी वाटत नाही, असा तिखट सवाल सुतार यांनी उपस्थित केला आहे.

खडी पसरलेल्या या रस्त्यावर अपघात घडून जीवित हानी झाल्यास पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, स्थापत्य विभाग अ प्रभाग आणि संबंधित ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही सुतार यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.