BCCI on Domestic Cricket: देशांतर्गत क्रिकेटसाठी अजून वाट पहावी लागणार

कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर सुरू करण्याचे दिले संकेत

एमपीसी न्यूज – देशांतर्गत क्रिकेटसाठी अजून वाट पहावी लागणार आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर सुरक्षित वातावरणात देशांतर्गत क्रिकेट सुरू करता येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संलग्न राज्य संघटनांना दिले आहे.

ऑगस्टमध्ये दर वर्षी स्थानिक क्रिकेटचा हंगाम सुरू होतो. यंदा करोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ने कोणतीही तारीख निश्चित केलेली नसल्याचे गांगुलीने गुरुवारी राज्य संघटनांना पत्र पाठवून कळवले आहे. आता सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेसह स्थानिक क्रिकेटचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात या स्पर्धेला प्रारंभ होऊ शकेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

परिस्थितीच्या अनुकूलतेनंतर देशांतर्गत क्रिकेट सुरू करता यावे, यासाठी ‘बीसीसीआय’ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या स्पर्धामध्ये खेळणारे खेळाडू आणि निगडित व्यक्तींचे आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बीसीसीआय या सर्व बाबींवर सातत्याने निरीक्षण करीत आहे, असे गांगुलीने संलग्न संघटनांचे अध्यक्ष आणि सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम नियोजित वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि भारतीय क्रिकेट संघ प्रयत्नशील आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. मग पुढील वर्षी फेब्रुवारीत भारताची मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिका रंगणार आहे. यानंतर एप्रिलमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2021 चा 14 वा हंगाम आयोजित करता येईल, असे गांगुलीने म्हटले आहे. भारतीय महिला संघाच्या मालिकांसंदर्भात आमची बोलणी सुरू आहे, असे गांगुलीने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.