Dapodi : सावधान ! जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहने पंक्चर करणा-यांची टोळी सक्रिय

एमपीसी न्यूज – तुम्ही जर जुना पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडी येथून प्रवास करीत असाल आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचं सांगितलं तर थोडी सावधानता बाळगा. दापोडी येथील सीएनजी पंपाजवळ हा प्रकार सर्रास घडत आहे. या परिसरात खिळे टाकून वाहने पंक्चर करणा-यांची टोळी सक्रिय आहे.

दापोडी परिसरात महामार्गावर पंक्चर वाल्यांचे एजंट फिरत असून एखाद्या वाहनाच्या चाकामध्ये हवा कमी असल्याचं सांगून नागरिकांना हवा भरण्यासाठी जवळच पंक्चरचे दुकान असल्याचे सांगितले जाते. पंक्चरच्या दुकानात गेल्यानंतर संबंधित वाहन पंक्चर असल्याचे सांगून पंक्चर काढण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर संपूर्ण ट्यूब आणि टायरची देखील वाट लावली जाते. याचा नागरिकांना नाहक भुर्दंड भरावा लागत आहे.

त्यामुळे वाहनांमध्ये हवा कमी असल्याचे कोणी सांगितले तर त्यावर विश्वास न ठेवता आपल्या जवळच्या मॅकेनिककडे जाऊन खात्री करा. दापोडी भागात रस्त्याच्या बाजूला अनेक लहान टप-या आहेत. त्यामध्ये सर्रास पंक्चर आणि वाहन दुरुस्तीचे दुकान सुरु केले जाते. मात्र या दुकानांसाठी भाडे मोठ्या प्रमाणात आकारले जाते. हे भाडे वसूल करण्यासाठी पंक्चर दुकानदार नवीन शक्कल लढवत आहेत. त्यांच्यातीलच काही तरुण दुकानाच्या आसपास दुचाकीवरून फिरतात. एखाद्या वाहनचालकाला हेरून त्याच्या दुचाकीमध्ये हवा कमी असल्याचे सांगतात. दुचाकीस्वार त्यावर विश्वास ठेऊन जवळ असलेले पंक्चरचे दुकान किंवा हवा तपासण्याचे दुकान शोधत त्यांच्याच दुकानी येतो. या दुकानात हवा तपासण्याच्या बहाण्याने दुचाकीचे चाक पंक्चर केले जाते.

यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. नागरिकांच्या खिशात हात घालून पैसे काढून घेण्याचे हे नवीन तंत्र हे टपरीचालक वापरत आहेत. पंक्चर रॅकेट विरोध करू न शकणारे सावज हेरते. यामध्ये शक्यतो तरुणी, लहान मुल सोबत असलेली व्यक्ती किंवा बाहेरगावाहून आलेले नागरिक यांचा समावेश असतो. प्रत्यक्षात हे एक मोठे रॅकेट असून हा सर्व प्रकार रोज घडत आहे, परिसरातील नागरिकांनाही या गोरखधंद्याची कल्पना आहे, परंतू कुणीही याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाही.

गणेश बोरा म्हणाले, “पुण्याहून चिंचवडकडे येते असताना दापोडी येथे अचानक गाडीत हवा कमी असल्याचे जाणवले. त्याच वेळी एक मुलगा दुचाकीवरून आला आणि त्याने गाडीत हवा कमी आहे, जवळच एक दुकान आहे. चेक करून घ्या, असे सांगितले. मात्र मला हा प्रकार माहिती असल्याने त्या दुचाकीस्वाराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पुढे काही अंतरावरून फुगेवाडीकडे निघून गेला. त्याने सांगितलेल्या दुकानात जाऊन चौकशी केली असता तो पंक्चर दुकानदारही चमकला. त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन तिथून पळ काढला.

बहुतांश वाहनांना ट्युबलेस टायर असतात. हवा कमी असल्याचे जरी कुणी सांगितले तरी लगेच थांबून बघण्याची घाई करू नका. कदाचित तुम्ही पंक्चर रॅकेटची शिकार होऊ शकता. ट्युब्लेस टायर असेल तर काही किलोमीटर पर्यंत प्रवास करणं शक्य आहे. वाहनांची परिस्थिती लक्षात घेऊन जागेवर थांबणे टाळा, असेही बोरा यांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे म्हणाले, “दापोडी येथे हा प्रकार घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. यापुढेही असे प्रकार घडल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, त्यावर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.