Moshi News : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मारहाण; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात मारहाण झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) रात्री गिलबिलेनगर, मोशी येथे घडली.

वैजनाथ शिवाजी मांजरे, पिराजी शिवाजी मांजरे, पिराजी यल्लाप्पा मांजरे, गंगाराम शिवाजी मांजरे (सर्व रा. गिलबिलेनगर, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णा मारुती येडके (वय 17, रा. गिलबिलेनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपी पिराजी शिवाजी मांजरे हा फिर्यादी यांच्या घरी आला. फिर्यादी यांचा भाऊ रामेश्वर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपी पिराजी शिवाजी मांजरे याने फिर्यादी यांना घराबाहेर ओढून नेले. तिथे आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ लखन या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी वैजनाथ याने फिर्यादी यांच्या डोक्यात दांडक्याने मारून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात वैजनाथ शिवाजी चमकुरे (वय 25, रा. गिलबिलेनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामू एडके, सायबु मांजरे, कृष्णा मांजरे आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारहाण केली होती. त्याबाबत आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन तक्रार मागे घेण्याची धमकी दिली.

फिर्यादी यांनी तक्रार मागे घेणार नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.