Chakan News : दोन गटातील भांडण सोडविणाऱ्या पोलिसाला मारहाण; एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – दोन गटात सुरु असलेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आली. त्यात एका पोलिसांच्या हाताला दुखापत झाली. तसेच भांडण सुरु असलेल्या एका गटातील व्यक्तीवर खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास माणिक चौक, चाकण येथे घडली.

याप्रकरणी मारहाण करणा-या दोन्ही गटातील 11 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. संदीप अरुण शिंदे (वय 42), हर्षल संदीप शिंदे (वय 21, दोघे रा. मेदनकरवाडी), ओंकार मनोज बिसणारे (वय 20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

यांच्यासह अभि सुखदेव घोडके, पराग बबन गायकवाड, सिद्धार्थ एलप्पा माने, प्रतीक शहाजी जाधव, निखिल उर्फ दाद्या रतन कांबळे, विवेक कु-हाडे, नामदेव नाईक, प्रणव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई अनिल कारोटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपींची एकमेकांसोबत भांडणे सुरु होती. दोन्ही गटातील लोक काठ्या, गज, दगडाने, हाताबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करत होते. ही भांडणे सोडविण्यासाठी पोलीस शिपाई अनिल कारोटे आणि त्यांचे सहकारी पोलीस गेले. भांडण सोडवत असताना आरोपींनी पोलिसांचे न ऐकता पोलिसांनाच शिवीगाळ केली.

पोलीस शिपाई कारोटे यांच्या सहकारी पोलिसांना मारहाण केली. यात कारोटे यांच्या हाताला दुखापत झाली. दरम्यान आरोपी निखिल उर्फ दाद्या कांबळे याच्या डोक्यात मारून आरोपींनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याबाबत खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.