Chakan News : रात्र गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – एका हॉटेलसमोर विनामास्क थांबलेल्या दोघांना रात्र गस्तीवरील पोलिसांनी हटकले. यावरून दोघांनी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 28) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास शेलपिंपळगाव हद्दीत हॉटेल संतोष समोर घडली. पोलिसांनी दोघांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

गणेश प्रकाश गुंडगळ (वय 28, रा. भोसे, ता. खेड), अमर शंकर मोहिते (वय 29, रा. मोहितेवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे बुधवारी रात्री शेल पिंपळगाव हद्दीतून रात्रगस्त घालत होते. मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास उपनिरीक्षक झेंडे यांना हॉटेल संतोष या हॉटेल समोर दोघेजण विना मास्क थांबलेले दिसले. त्यामुळे झेंडे यांनी ‘तुम्ही रात्री उशिरा येथे काय करताय. तुम्ही तोंडाला मास्क लावलेले नाही’, अशी आरोपींना विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी ‘आम्ही स्थानिक आहोत. तुम्ही आम्हाला कोण विचारणार’, असे म्हणून उपनिरीक्षक झेंडे यांना शिवीगाळ केली. तसेच झेंडे यांच्या गणवेशाचे गचूरे धरून धक्काबुक्की करत मारहाण केली.

यामध्ये झेंडे जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक झेंडे यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.