Beed News: बीड पोलीस दलातील रॉकी श्वानाचे दीर्घ आजाराने निधन; 365 गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका

Beed News: Rocky dog ​​dies in Beed police force; important role in 365 revealing crime cases मागील काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला. अनेक दिवस त्याने आजारपणाशी कडवी झुंज दिली.

एमपीसी न्यूज – बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी (15 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या निधनामुळे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रॉकीने त्याच्या कारकिर्दीत तब्बल 365 क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत केली होती.

क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना तांत्रिक विश्लेषण पथक आणि श्वान पथक ही दोन पथके मोलाची मदत करतात. दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त यांसारख्या विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावत असते.

महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. रॉकीने आजपर्यंत 365 गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. रॉकी बीड पोलिसांच्या गळ्यातील ताईत बनला होता.

रॉकीने वर्ष 2016 मध्ये म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय AIPDM स्पर्धेमध्ये कास्य पदक प्राप्त करून महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली होती.

मागील काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला. अनेक दिवस त्याने आजारपणाशी कडवी झुंज दिली. मात्र, त्याची प्राणज्योत स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पहाटे चार वाजता मालवली. रविवारी (दि.16) रॉकीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रॉकीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.