Sushant Searched His Name: सुशांतने मृत्यूपूर्वी गुगलवर सर्च केले स्वतःचे नाव

त्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचे समजले आहे. तो उपचार घेत होता आणि त्यासाठी औषधे घेत होता. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासणीचा विषय आहे'

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता अनेक गोष्टी प्रकाशझोतात येत आहेत. वरकरणी नॉर्मल वाटणा-या अनेक गोष्टींमधील सत्य शोधण्याच्या मागे पोलिस लागले आहेत. त्याचवेळी एक वेगळी गोष्ट समोर आली आहे. सुशांतने मृत्यूपूर्वी काही तास अगोदर गुगलवर स्वतःचे नाव सर्च केल्याचे मुंबई पोलीस प्रमुख परमबीर सिंह यांनी माध्यमांना सांगितले.

सुशांतसिंह राजपूत त्याच्या मृत्यूपूर्वी काही महिने बायपोलर डिसऑर्डरसाठी औषधोपचार घेत होता, असे डॉक्टरांकडून समोर आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. १४ जून रोजी झालेल्या त्याच्या मृत्यूपूर्वी काय घडले असावे याचा तपास मुंबई पोलिसांनी केला. त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्याची माहिती पेलिसांनी दिली.

सुशांतने ९ जून रोजी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधी शोधले होते. त्याला असलेल्या मानसिक आजाराचा सर्च केला होता. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे नाव या आत्महत्येशी जोडले गेले का याविषयी त्याला शोध घ्यायचा होता. तसेच मृत्यूपूर्वीच्या काही तासांत त्याने स्वत:च्या नावाचा गुगलवर शोध घेतला होता.

त्याच्या मोबाइल फोन आणि लॅपटॉपवरुन हा तपशील समोर आला आहे. त्याच्या गुगल सर्चवरुन असे दिसून आले आहे की, दिशा सॅलियनच्या आत्महत्येशी त्याला जोडल्या गेल्याच्या अंदाजाबद्दल त्याला काळजी वाटत असावी.

मुंबई पोलिस प्रमुख परमबीर सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, ‘त्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचे समजले आहे. तो उपचार घेत होता आणि त्यासाठी औषधे घेत होता. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासणीचा विषय आहे’.

ते म्हणाले की, तपासात कोणत्याही राजकारणी व्यक्तीचे नाव समोर आले नाही. सध्या सोशल मीडियावर अनेक मेसेज या संबंधी येत असले तरी त्यात कोणत्याही पक्षाच्या राजकारण्याविरुद्ध पुरावा नसल्याचे त्यांनी नमूद केले.

सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती विषयी बोलताना ते म्हणाले की, ‘रियाच्या खात्यात आत्तापर्यंत कोणत्याही रकमेचे थेट हस्तांतरण झालेले नाही. तिचा जबाब दोनदा नोंदविण्यात आला आणि तिला अनेक वेळा पोलीस ठाण्यात बोलावले गेले. मी तिच्या ठावठिकाण्याबद्दल काही बोलू शकत नाही’, असे देखील त्यांनी सांगितले.

परमबीर सिंह यांनी बिहार पोलिसांच्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, सुशांतसिंहचे वडील, बहीण आणि मेहुणे यांनी त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी 16 जून रोजी त्यांचे निवेदन नोंदवले. पण त्यांनी कधीही संशय व्यक्त केला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.