Lonavala : भीक मागण्यासाठी आलेल्या भिका-यानेच केली चोरी

एमपीसी न्यूज – भीक मागण्यासाठी आलेल्या भिका-याने जबरदस्तीने घरात प्रवेश करून ३७ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. हा प्रकार रविवारी (दि. 19) दुपारी तीनच्या सुमारास लोणावळामधील रेल्वे क्वार्टर येथे घडला. 

लकप्पा हनुमंत कोळी (वय 54, रा. डी-4, रेल्वे क्वार्टर, लोणावळा. मूळ रा. सलगर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सिद्धार्थनगर, लोणावळा येथील एका अल्पवयीन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी हे रेल्वे कर्मचारी आहेत. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा कोळी यांच्या घरी भीक मागण्यासाठी आला. त्यावेळी घराच्या समोरच्या खोलीत कोणीही नव्हते. याचा फायदा घेत मुलाने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. घरातून 21 हजार रुपये किमतीचा एक आयफोन आणि 16 हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा एक मोबाईल फोन चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.