Belgaon News : ‘शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील’, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांचा अजब दावा

एमपीसी न्यूज – बेळगाव सिमावादावरून महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात शाब्दिक वाद सुरू असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी अजब दावा केेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

गोविंद कार्जोळ यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी हे वक्तव्य केले. महाराष्ट्रात संमिश्र सरकार आहे. काँग्रेस केव्हा आपल्याला खुर्चीवरून उतरवेल याची भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्या कारणासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत असल्याचे कार्जोळ म्हणाले.

कार्जोळ पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी इतिहास वाचलेला नाही. त्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत. कर्नाटकात दुष्काळ पडला म्हणून ते महाराष्ट्रात गेले. त्यांच्या नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत, असं गोविंद कार्जोळ म्हणाले.

कर्नाटकात मराठी, कन्नड जनता प्रेमाने राहते. जात मराठा असली तरी ते कन्नडच आहेत. महाराष्ट्रात देखील कन्नड मराठी जनता प्रेमाने राहते. उध्दव ठाकरे यांनी खुर्चीसाठी वातावरण बिघडवायचे काम करू नये, असे देखील गोविंद कार्जोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.