India Corona Update : देशातील सक्रिय रुग्ण 8 लाखाच्या खाली, 24 तासांत 62 हजार नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – भारतातील रुग्णवाढ साठ हजारांवर स्थिरावली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 62 हजार 480 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 1 हजार 587 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आठ लाखाच्या खाली आली असून, सध्या 7.98 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 97 लाख 62 हजार 793 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 85 लाख 80 हजार 647 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 88 हजार 977 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 7 लाख 98 हजार 656 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 83 हजार 490 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 1 हजार 587 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.28 टक्के एवढा झाला आहे तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 96 टक्क्यांवर पोहोचले आहे.

देशात आजवर 38 कोटी 71 लाख 67 हजार 696 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 29 हजार 476 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 26 कोटी 89 लाख 60 हजार 399 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. मागील चोवीस तासांत 32 लाख 59 हजार 3 जणांना लस टोचण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.