Bengaluru : CeNS ने विकसित केले सलग अनेक तास वापरता येतील असे आरामदायक मास्क

Bengaluru: A comfortable mask developed by CeNS that can be used for several hours in a row

एमपीसी न्यूज – विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत स्वायत्तपणे कार्यरत असलेल्या बंगळुरू येथील ‘सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स’ (Centre for Nano and Soft Matter Sciences – CeNS) या संशोधन संस्थेने कपाच्या आकारात मास्कचे डिझाईन विकसित केले आहे. या डिझाईनचे बौद्धिक स्वामित्व घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या नव्या डिझाईनच्या मास्कमुळे बोलताना तोंडाच्या पुढच्या बाजूला पुरेशी जागा उपलब्ध होते. नव्या डिझाईनच्या मास्कचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी बंगळूरूस्थित एका कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे.

कोविड-19 पासून संरक्षण करणारा मास्क सलग अनेक तास वापरताना कामावर परिणाम होवू नये, याचा नवीन डिझाईन करताना विचार केला असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी सांगितले.

तोंडावर अगदी नीट बसणाऱ्या या मास्कमुळे व्यक्ती काय बोलते, ते व्यवस्थित समजू शकेल, तसेच चष्म्यावर धुके तयार होणार नाही. शिवाय श्वास सहजपणे घेता येईल; तसेच उच्छवास बाहेर पडण्याची शक्यता नाही. जर एखाद्या व्यक्तीला श्वासोच्छावासाचा काही त्रास असेल, तरीही त्याला कोणत्याही प्रकारे अस्वस्थ वाटणार नाही. त्यामुळे असा मास्क वापरणे सर्वांनाच आरामदायक आहे. बराचकाळ एखादा मास्क वापरल्यानंतर त्यावर किटाणूंची निर्मिती होते, हे लक्षात घेवून त्या किटाणूंना निष्क्रिय करण्याचीही सोय करण्यात आली आहे. तसेच मास्कसाठी ज्या कापडाचा वापर केला आहे, त्याला त्रिकोणी आकार दिल्यामुळे अगदी सौम्य प्रमाणात घर्षण होते. मास्कच्या आणखी प्रगत चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे.

भारत आणि इतर देशांमध्येही कोविड-19 प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे सामान्य जनतेलाही मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळींसाठी उच्च तांत्रिक गुणवत्ता असलेले वैद्यकीय मास्क वापरू शकतात. हेच मास्क सामान्य मंडळींनी वापरण्याऐवजी मध्यम फिल्टरिंगची व्यवस्था असलेले मास्क वापरणे पुरेसे आहे. वैद्यकीय मास्क सर्वांनीच वापरण्याची गरज नाही. मात्र सलग बरेच तास जर मास्क वापरायचा असेल, तर तो अधिक आरामदायक असणे गरजेचे आहे. नाहीतर लोकांना मास्क वापरणे त्रासदायक वाटेल, हे लक्षात घेवून ‘सीएनएस’ने आरामदायक मास्क तयार केले आहेत.

‘CeNS’ने या मास्कचे तंत्रज्ञान कॅमलिया क्लोदिंग लिमिटेड (Camellia Clothing Ltd) या बंगळुरूस्थित कंपनीला हस्तांतरीत केले आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी ही कंपनी स्थापन झाली आहे. या कंपनीच्यावतीने दररोज जवळपास एक लाख मास्क निर्माण केले जाणार आहेत. तसेच वेगवेगळ्या वितरण शृंखलेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हे मास्क पोहोचवण्याची कंपनीची इच्छा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.