‘बेस्ट सिटी टू स्मार्ट सिटी’!

पिंपरी-चिंचवडची दैदिप्यमान वाटचाल

(गणेश यादव)

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, क्रांतीवीर चापेकर बंधू यांची जन्मभूमी असलेली पिंपरी-चिंचवडची भूमी आहे. ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करुन स्थापन झालेल्या नगरपालिकेने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका असा लौकिक मिळविला. खेड्याकडून शहराकडे, शहरातून महानगराकडे आणि महानगराकडून आता ‘स्मार्ट सिटी’कडे हे पिंपरी-चिंचवड शहर पाऊल टाकत आहे.

औद्योगिक, कामगार, क्रीडा, उद्यान, हरितनगरी, बेस्ट सिटी अशी बिरुदावली मिळाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्टनगरी अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची 11 ऑक्टोबर 1982 रोजी स्थापना झाली खरी, मात्र या शहराचा खरा विकास झाला तो जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजने (जेएनएनयूआर)मध्ये महापालिकेचा समावेश झाल्यानंतर. पाणीपुरवठा योजना, उड्डाणपुल, रस्ते, वाहतूक, व्यवस्थापन, जलनि:सारण, आरोग्य, ई-गव्हर्नन्स, भूमिगत गटारे, उद्याने, क्रींडागणे विकसित झाली. उत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्याने चेहरा मोहरा बदलून हे शहर मॉडर्न, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत तिसऱ्या टप्यात समावेश झाला. स्मार्ट सिटी अभियानाचा कालावधी पाच वर्षाचा असून या योजनेत पाच वर्षात केंद्र सरकारकडून 500 कोटींचे अनुदान मिळणार आहे. पाच वर्षात एक हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. त्यामध्ये शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, खात्रीशीर वीजपुरवठा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सक्षम इंटरनेट सुविधा, आरोग्य आणि शिक्षण सुविधा, ई-गर्व्हनन्स व नागरिकांचा सहभाग, पर्यावरण, नागरिकांची सुरक्षा व संरक्षण इत्यादी घटकांचा समावेश आहे.

त्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड’ या नावाने विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना केलेली आहे. व्यवसायासाठी सुलभ व सोपी कार्यप्रणाली राबविणे. नागरिकांची जीवनशैली, गुणवत्ता सुधारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक केंद्रित स्मार्ट प्रशासन सुनिश्चित करणे हे स्मार्ट सिटीचे उद्दिष्ट आहे. तर, 2030 पर्यंत भारतातील सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या प्रगत व राहण्यायोग्य पिंपरी-चिंचवड शहर बनविणे हे ध्येय आहे.

त्या अंतर्गत महापालिकेने रेट्रोफिटिंग अर्थात परतफेड या पर्यायाचा वापर करून स्मार्ट सिटी प्रपोजल तयार केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, चौक, शाळा, विविध इमारती व अन्य मालमत्तांचा वापर करण्यात येणार आहे. मालमत्ता वापरण्याचे सर्वाधिकार आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहेत. कामाला गती देण्यासाठी ही कौतुकाची बाब असून त्यासाठी महापालिकेकडून देखील हातभार लावला जात आहे. शहर ख-या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

स्मार्ट सिटीत प्रथम शहराचा कोणत्या परिसराची निवड करायची यासाठी नागरिकांकडून विविध माध्यमातून अभिप्राय, सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार प्रथमत: पिंपळेगुरव आणि पिंपळेसौदागर या परिसराचा समावेश झाला असून या परिसराचा स्मार्ट विकास करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेने कामकाज सुरु केले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर येथे प्रायोगिक तत्त्वावर सायकल शेअरिंग योजना सुरू केली आहे. एरिया बेस डेव्हल्पमेंट (एबीडी) अंतर्गत शहरात सर्वत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच्‌) व निगडी- प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, प्रायोगिक तत्त्वावर सहा शाळांमध्ये ‘म्युनिसिपल क्लासरूम’ सुरू करणे, पॅन सिटीअंतर्गत फायबर ऑप्टिकल केबल टाकणे, या माध्यमातून शहराची वाटचाल ख-या अर्थाने स्मार्ट सिटीकडे सुरू झाली आहे.

सद्य:स्थितीचा विचार करून भविष्यातील नियोजनासाठी महापालिकेने शहर परिवर्तनाचा मार्गही अवलंबिला आहे.
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत महापालिकेने शहर परिवर्तन कार्यालय सुरू केले आहे. त्या माध्यमातून शहराच्या सद्य:स्थितीचा अभ्यास करून भविष्यातील नियोजनासाठी उपाययोजना सुचविल्या जात आहेत. त्यासाठी शहर परिवर्तन कार्यालयाने सध्याचे नोकरी- व्यवसायासाठी आणि भविष्यात राहण्यायोग्य उत्तम शहर बनविण्याचे नियोजन सुरू आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा करून प्रक्रिया केली जात आहे. यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रबोधन सुरू आहे. ओल्या कच-यापासून खतनिर्मिती करणे सोसायट्यांना बंधनकारक केले आहे. ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून शहरातील सोडियम व्हेपर, टी-5, सीएफएल, मेटल हालाईड दिवे बसवून एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बेघर व्यक्तींसाठी शहरात च-होली, डुडुळगाव, रावेत, दिघी, मोशी, वडमुखवाडी, चिखली, पिंपरी आणि आकुर्डी अशा 10 ठिकाणी घरकुल प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीला मूर्त स्वरुप येण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पातील सुविधा

सायकल शेअरिंग प्रकल्प शहराच्या सर्व भागांत राबविण्यासाठी सर्वेक्षण
सोलर सिस्टिम प्रकल्प शहराच्या विविध भागांमध्ये राबविण्याचे नियोजन
पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, चिखली येथील सहा शाळांमध्ये ‘म्युनिसिपल क्लासरूम’ उभारणार. त्यात डिजिटल व कॉम्प्युटर लॅब, ई-लर्निंग साहित्य असेल
दोन इमारतींवर ‘रूफ टॉप सोलर’ प्रकल्प उभारणार
पॅन सिटीअंतर्गत फायबर ऑप्टिकल केबलसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार
वायसीएमएच्‌ आणि सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात सौरउर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे.
पॅन सिटीअंतर्गत फायबर ऑप्टिकल केबलसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
एरिया बेस डेव्हल्पमेंट (एबीडी) अंतर्गत शहरात सर्वत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत.
पॅनसिटी अंतर्गत ‘इन्क्युबेटर सेंटर’ उभारण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार
शहरात तब्बल तीनशे ‘वायफाय स्पॉट’ आणि ‘स्मार्ट किऑस्क’ निर्माण करण्यात येणार
गुन्हेगारी कमी करण्याकरिता 600 ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येणार

प्रतिक्रिया-

अॅड. किरण चव्हाण – ‘सध्या शहरात प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाला आहे. स्मार्ट सिटीकडे शहर वाटचाल करत असताना प्रदूषणाच्या विविध समस्यांनी ग्रसित होऊन स्मार्ट होण्यात काहीही अर्थ नाही. स्मार्ट सिटीतील नागरिक जेवढा आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत असायला हवा, तेवढाच शारीरिक दृष्ट्या सदृढ असायला हवा. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे ध्वनी, वायू प्रदूषण वाढत आहे. नद्यांमध्ये दूषित पाणी सोडल्याने नद्यांची गटारगंगा झाली आहे. स्मार्ट सिटीत देखील अशीच गटारगंगा वाहणार असेल तर त्या सिटीला स्मार्ट सिटी म्हणता येणार नाही. विदेशी प्रकल्प, कंपन्या शहरात आणणे, शहराच्या उत्पन्नात भर घालणे म्हणजे स्मार्ट किंवा ताकदवान होणे नाही. तर शहरातल्या नागरिकांच्या हाताला रोजगार व्यवसायाच्या संधी मिळायला हव्यात. उत्तम सार्वजनिक वाहतूक सेवेला चालना मिळायला हवी. आधुनिकतेची कास धरली तरी पारंपरिक आणि संस्कृतीला कुठेही बगल मिळता कामा नये. अशीच अपेक्षा स्मार्ट सिटीकडून आहे’.

आयुक्त श्रावण हर्डीकर – ‘महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत कामकाजास 2017 अखेरीस सुरुवात केली. त्याचे आराखडे बनविण्यासाठी दोन सल्लागारांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत 70 टक्के प्रकल्पांचे आराखडे आत्तापर्यंत बनविले आहेत. पॅनसिटी अंतर्गत संपूर्ण शहरात डिजीटल इन्फ्रास्ट्रकचरचे बॅकबोन तयार करण्याची पहिली निविदा काढली आहे. स्मार्ट सिटीअतंर्गत कंमाड अॅन्ड कंट्रोल सेंट्रल, स्मार्ट पाणीपुरवठा, स्मार्ट जलनि:सारण, वाहतूक, पार्किंग, लाईटिंग, पोलिसांसाठी सेफ्टी, सिक्युरीटी, सिटी सर्व्हेलियन्स या संपूर्ण प्रकल्पांसाठीची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. या दोन महत्वाकांक्षी उपक्रमांसोबतच पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर या एरिया बेस डेव्हलमेंटसाठी निवडलेल्या भागात एकात्मिक रस्ते विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्याची लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होईल. एकात्मिक उद्यान विकास, हरित प्रभाग विकासाची निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. एकात्मिक रस्ते विकासामध्ये सर्व गोष्टीने परिपूर्ण, पादचा-यांसाठी सोयीयुक्त, सायकल ट्रॅकयुक्त रस्ते याअंतर्गत बनविले जाणार आहेत. यासोबतच स्मार्ट अंतर्गत पब्लिक बायसिकल शेअरिंग, इमारतींवरील सौरउर्जा प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. स्मार्ट क्लास रुम या प्रकल्पाची प्रक्रिया सुरु झाली असून प्रायोगिक तत्वावर सहा शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे’.

‘नाविन्यपूर्ण प्रकल्पाअंतर्गत कोकणे चौक येथे हॉकर्स झोनची निर्मिती करणे, पिंपळेसौदागर येथे कल्चरल प्रभाग निर्माण करुन सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्र निर्माण करणे. या प्रकल्पांचे काम सुरु असून लवकरच सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. स्मार्ट सिटीअंतर्गत पब्लिक बायसिकल शेअरिंग हा उपक्रम लवकरच संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे. स्मार्ट सिटीत सुरु करुन संपूर्ण शहरात राबविण्यात येणारा सायकल शेअरिंग हा पहिलाच प्रकल्प आहे. या सोबतच पादच-यांसाठी पादचारी मार्गात सुधारणा केली जाणार आहे’.

स्मार्ट सिटीतील कामास 100 टक्के मूर्त स्वरुप दिसण्यास तीन वर्षाचा कालावधी लागेल. अनेक प्रकल्प आगामी वर्षभरात 50 टक्के पूर्ण होतील. आजमितीला स्मार्ट सिटीअंतर्गत ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग आणि सौर उर्जेचा प्रकल्प सुरु असून उर्वरित प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरु आहे’.

महापौर राहुल जाधव: – ‘पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगात वाटचाल सुरु आहे. संपूर्ण शहरात पब्लिक सायकल शेअरिंग प्रकल्प सुरु केला जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या दहा शाळा स्मार्ट केल्या जाणार आहेत. स्मार्ट सिटीतील कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची देखील आवश्यकता आहे. आगामी दोन वर्षात शहरातील सर्व नागरिकांना स्मार्ट सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.