Pimpri News: कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ‘प्लाझ्मा थेरपी’पेक्षा चांगली औषधे; डॉक्टरांचे मत

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांसाठी वापरली जाणारी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. आयसीएमआर आणि टास्क फोर्सच्या बैठकीत प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरपी बंद झाल्याने पुढील उपचार पद्धती कशी असेल याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने डॉक्टरांची मते जाणून घेतली.

प्लाझ्मा थेरपीपेक्षा चांगली औषधे उपलब्ध – डॉ. वाबळे

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”प्लाझ्मा थेरपीला कोरोना उपचार पद्धतीतून वगळले आहे. एखाद्या फिजीशनला प्लाझ्मा थेरपी द्यावी असे वाटत असेल. तर, ते देवू शकतात. पण, शासनाने उपचार पद्धतीतून वगळल्याने कोणीही थेरपी देण्याचा निर्णय घेईल असे वाटत नाही. आत्तापर्यंत प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी नातेवाईकांकडून आग्रह केला जात असे. कोरोना उपचार पद्धतीत त्याचा समावेश असल्याने थेरपी दिली जात होती. आता नातेवाईकांचे प्रेशर कमी होईल.

तरीही नातेवाईकांनी आग्रह केला. तर, रुग्णाला काही झाले, तर तुमची जबाबदारी राहील असे नातेवाईकांकडे लिहून घेतले जाईल. उपचाराच्या सातव्या-आठव्या दिवशी प्लाझ्मा दिला. तर, काही रुग्णांमध्ये प्लाझ्माचा परिणाम दिसत होता. सर्वच रुग्णांमध्ये परिणाम दिसत नव्हता. काही रुग्णांना प्लाझ्मा थेरपी घातक ठरत असल्याचे दिसून आले. आजाराच्या ज्या दिवशी प्लाझ्मा देण्याची वेळ होती. ती पाळली जात नव्हती. त्यामुळे रुग्णांना त्रास होत होता. प्लाझ्मा थेरपीपेक्षा चांगली औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यातून रिझल्ट दिसत आहेत. व्हायरसचा लोड नियंत्रणात येत आहे. आम्ही सरकारच्या नियमांचे पालन करणार आहोत. प्लाझ्मा थेरपी उपचारातून वगळली जाईल”.

प्लाझ्मा देऊन रुग्णाला धोक्यात टाकण्याची आवश्यकता नाही – डॉ. होडगर

जिजामाता रुग्णालयाचे डॉ. बाळासाहेब होडगर म्हणाले, ”उपचाराच्या निश्चित कालावधीत रुग्णाला प्लाझ्मा दिला तरच फायदा होत होता. जास्त फायदा होत नव्हता. त्यापेक्षा इतर औषधे, इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे प्लाझ्मा देऊन रुग्णाला धोक्यात टाकण्याची आवश्यकता नाही. प्लाझ्मा दिला म्हणून रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे सिद्ध झाले नाही. उपचाराचा छोटासा भाग होता. आता उपचाराची चांगली नियमावली झाली आहे. त्यामुळे प्लाझ्माची गरज नाही. नवीन उपचार पद्धतीनुसार कोरोनावरीव रुग्णांवर उपचार केले जातील”

प्लाझ्मा थेरपी पूर्णपणे बंद केली नाही – डॉ. पाटील

वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील म्हणाले, ”कोरोनाचा स्ट्रेन बदलत आहे. त्याची टास्क फोर्सला भिती आहे. स्ट्रेन बदलत आहे का हे तपासण्यासाठी प्लाझ्माचा वापर थांबविला आहे. योग्यवेळी प्लाझ्माचा वापर केला. तर, त्याचा निश्चितच फायदा होत आहे.

पूर्णपणे प्लाझ्मा बंद केला नाही. फक्त वापरु नका असे सांगितले आहे. त्यासाठी स्ट्रेन बदलत असल्याचा तोटा सांगितला आहे. प्लाझ्माचा वापर वाढला होता. रुग्णाची परिस्थिती न पाहताच खासगी हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा दिला जात होता. त्याअनुषंगाने प्लाझ्मा थेरपी बंद केली आहे. 100 रुग्णांना प्लाझ्मा दिला तर त्यातील 70 ते 80 रुग्णांना नक्कीच फायदा झाला आहे. 20 टक्के रुग्णांना फायदा झाला नाही. प्लाझ्मा खूप मोठा धोका नाही. रेमडेसिवीर, स्टेरॉईड जास्त वापरु शकत नसल्याने प्लाझ्मा थेरपी आली होती”.

डॉक्टरांनी मागणी केल्यानुसार प्लाझ्मा उपलब्ध करुन दिला जाईल – डॉ. पाटील

वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. तुषार पाटील म्हणाले, ”डॉक्टरांनी मागणी केल्यानंतर रक्तपेढीकडून प्लाझ्मा दिला जातो. रक्तपेढी थेट रुग्णाला प्लाझ्मा देत नाही. रुग्णाला प्लाझ्मा लागणार आहे किंवा नाही हे डॉक्टरांनी ठरवायचे आहे. आयसीएमआयरने नियमावली दिली असली. तरी शेवटी डॉक्टर रुग्णावर उपचार करत आहेत.

त्यांनी प्लाझ्मा देणे, त्याचा फायदा होतो की नाही हे ठरवायचे आहे. रक्तपेढीत प्लाझ्मा तयार केला जातो. डॉक्टरांनी मागणी केल्यानुसार प्लाझ्मा उपलब्ध करुन दिला जाईल. दिवसाला 30 ते 40 जणांची मागणी होत होती. 25 ते 30 जणांना प्लाझ्मा उपलब्ध करुन दिला जात होता. कोरोनावर निश्चित उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे तातडीची गरज म्हणून प्लाझ्मा थेरपीला परवानगी देण्यात आली होती”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.