Corona Lonavala Update: खबरदार!, होम क्वारंटाईनवाल्यांनो घराबाहेर पडलात तर…

Beware If the home quarantine persons is out of the house they will be institute quarantine in lonavala maval

एमपीसी न्यूज- ग्रीन झोन असलेल्या मावळ तालुक्यातही कोरोना बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक उपाय योजले आहेत. होम क्वारंटाईन केलेली व्यक्ती घराबाहेर पडताना सापडल्यास त्याची रवानगी आता इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये केली जाणार आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ही कारवाई लोणावळा शहरात सुरू करण्यात आली आहे.

मुंबईकडून पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या खंडाळा येथील चेकपोस्टवर जिल्ह्यात प्रवेश करणारी प्रवासी वाहने तपासली जात आहे. विना परवाना येणाऱ्यांना एकतर माघारी पाठवले जात आहे किंवा हुज्जत घालणार्‍यांवर गुन्हे दाखल करून 14 दिवस इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले जात आहे. जे नागरिक परवाना घेऊन येत आहेत.

त्यांना घरात मुबलक जागा असल्यास होम क्वारंटाईन व जागा नसल्यास इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले जात आहे. होम क्वारंटाईन केलेले नागरिक हातावर शिक्के असताना देखील घराबाहेर पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशान्वये आता होम क्वारंटाईन केलेली व्यक्ती कालावधी संपण्यापूर्वी घराबाहेर पडल्यास त्याला थेट इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले जाणार आहे.

लोणावळ्यात आजमितीला पाचशेच्या आसपास नागरिक क्वारंटाईनमध्ये आहेत. या सर्वांना त्याप्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीची रोज लोणावळा नगरपरिषद कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून चौकशी करून आरोग्याची काळजी घेतली जात आहे. रविवारी रात्री लोणावळ्यात विना परवाना प्रवेश करू पाहणार्‍या बारा वाहनांना माघारी पाठविण्यात आले तर आज एका वरिष्ठ अधिकार्‍यांला देखील माघारी जावे लागले.

लोणावळा शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये याकरिता लोणावळा नगरपरिषद व लोणावळा पोलीस प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहेत. नागरिकांनी देखील नियमांचे पालन करावे, कोणी नवीन व्यक्ती आपल्या आजुबाजूला आल्यास तक्रार नगरपरिषदेला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोणावळा शहरातील खंडाळा, जुना खंडाळा, तुंगार्ली, गोल्ड व्हॅली, नांगरगाव, वलवण भागातील बहुतांश बंगल्यांमध्ये मुंबईकर आले आहेत.

खंडाळा व जुना खंडाळा रायवूड भागात 115 तर तुंगार्ली न्यू तुंगार्ली 184 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासह भुशी रामनगर 64, भांगरवाडी 75, हुडको, वर्धमान सोसायटी, हनुमान टेकडी भागात 44, रेल्वे विभागात 18 तर बाजारपेठ भागातील नागरिकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोव्हिड टेस्ट सेंटरला मान्यता

लोणावळा शहरात कोव्हिड टेस्ट सेंटरला मान्यता मिळाली आहे. मागील आठवडाभरापूर्वी लोणावळा नगरपरिषदेने शासनाकडे कोव्हिड टेस्ट सेंटरकरिता प्रस्ताव पाठविला होता. दोन ते तीन दिवसात हे सेंटर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील झालावाडी याठिकाणी सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.