BH series and Horns : गाड्यांच्या हॉर्नला आता भारतीय वाद्यांचे आवाज, BH सिरीजची ही घोषणा

एमपीसी न्यूज – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गाड्यांच्या क्रमांक यांच्याबाबत गोंधळ कमी करण्यासाठी तसेच कर्णकर्कश हॉर्न बाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची (BH series) अधिसूचना जारी करण्यात आली असून, गाड्यांना आता भारतीय आता भारतीय वाद्यांचे आवाज देता येतील का याबाबत विचार सुरू आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिली आहे.

‘गाड्यांचे हॉर्न योग्य पद्धतीचे असले पाहिजेत, त्यामधूनच आता गाड्यांच्या हॉर्नचे आवाज हे भारतीय वाद्यांचे असावेत असा विचार आम्ही सुरु केला असून त्यासंदर्भात काम सुरु आहे. हॉर्नच्या आवाजामध्ये तबला, पेटी, व्हॉयलिन, बिगूल, तानपुरा, बासरी यासारख्या वाद्यांच्या आवाजाचा समावेश करण्यात येणार असल्याचं गडकरी यांनी सांगितले.

‘लवकरच नवीन नियम बनवून त्यासंदर्भातील कायदा लागू केला जाणार आहे. यापैकी काही नियम हे थेट वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना लागू केले जाणार आहेत असं गडकरी म्हणाले. त्यामुळे गाडी कारखान्यामधून बनवून येताच त्यामध्ये या वाद्यांचा आवाज असणारे हॉर्न असणार आहेत,’ असे गडकरी यांनी नमूद केले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत आता वाहनधारक बीएच (BH) सीरिजमध्ये आपली नवीन वाहने नोंदवू शकतील. या सिरीजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नोकरीच्या संदर्भात इतर कोणत्याही राज्यात जाताना, या क्रमांकाच्या वाहन धारकांना नवीन नोंदणी क्रमांक घेण्याची गरज भासणार नाही. या व्यवस्थेअंतर्गत, बीएच सिरीज असलेली वाहने जुन्या नोंदणी क्रमांकावरूनच आपले वाहन दुसऱ्या राज्यात सहज चालवू शकतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.