Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम व स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव 

एमपीसी  न्यूज –  या राष्ट्राचे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मारता मारता मरे तो झुंजेन या युद्धात मी चापेकरांसारखा अपयशी होऊन बलिदान देईन किंवा शिवरायांसारखा यशस्वी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकावर स्वराज्याचा अभिषेक करेन जय अंबे, जय दुर्गे’’ ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिज्ञा प्रत्येक पालकांनी व गुरुजनांनी मुलांकडून दररोज वदवून घ्यावी. त्यातूनच मुलांमध्ये ज्वाज्वल्य राष्ट्राभिमान जागृत राहिल, असे सिनेअभिनेते व व्याख्याते योगेश सोमण यांनी निगडीत येथे केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने भगवान परशुराम व स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सवाचे आयोजन शुक्रवारी (दि. 24 मे ) करण्यात आले होते. त्याअंतर्गत प्राधिकरणातील सावरकर भवन येथे सिनेअभिनेते व व्याख्याते योगेश सोमण यांचे ‘‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके ते स्वातंत्र्यवीर सावरकर’’ या विषयावर व्याख्यान झाले.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचे महासंघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ब्राह्मण महासंघ दिलीप कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस संजीवनी पांडे,  सरचिटणीस महेश बारसावडे, कार्याध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, उपाध्यक्ष राजन बुडूख, उत्सव समिती प्रमुख सुहास पोफळे, उद्योजक आघाडीचे संदीप बेलसरे, उपक्रम प्रमुख अनंत कुलकर्णी, चिंचवड विभाग प्रमुख राहुल कुलकर्णी, वकील आघाडीच्या ॲड. अंतरा देशपांडे, सुषमा वैद्य, उज्वला केळकर आदी उपस्थित होते.

योगेश सोमण म्हणाले की, पुण्यात रँड आणि आर्यस्टन यांच्या खुनाच्या आरोपात चोपकर बंधूंना फाशी झाल्याची बातमी वाचल्यानंतर नाशिकमधील भगूर गावात वयाच्या 14व्या वर्षी विनायक दामोदर सावरकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वेळप्रसंगी स्वत:चे बलिदान देईन अशी प्रतिज्ञा देवघरात देवासमोर केली. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याकडून स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा घेतली होती. तोच वारसा फडके व दौलतराव नाईक यांच्याकडून  न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, चापेकर बंधू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वारसा पुढे चालत राहिला. 17 एप्रिल ते 26 एप्रिल 1879 या काळात वासुदेव बळवंत फडके यांनी आत्मवृत्त लिहिले.

वासुदेवांपासून सावरकरांपर्यंत सर्वांनी लोकशाही प्रस्थापित व्हावी म्हणून लढा उभारला. 3 जुलैला वासुदेवांना जन्मठेपेची शिक्षा झाली. 17 फेब्रुवारी 1883 एडणमधील तुरुंगात वासुदेव क्षयरोगाने निवर्तले. तेव्हाही त्यांच्या हातात हिंदुस्थानची माती होती अशी नोंद बर्वे यांच्या लिखाणात आहे. चीन हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यासाठी आपल्या सा-या सीमा सुरक्षित करा, असे सावरकरांनी सांगितले होते. हे किती आवश्यक होते हे स्वातंत्र्यानंतर 1962ला चीनने भारतावर हल्ला केला या वेळी दिसून आले, असेही सोमण यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना गोविंद कुलकर्णी म्हणाले की, ब्राह्मण समाजातील युवक युवतींनी उद्योग व्यवसायात पुढे यावे यासाठी पुण्यात ब्रह्मोद्योग प्रकल्प राबविण्यात आला. यात एक हजारांहून जास्त युवकांनी सहभाग घेतला होता. यात नवतरूण उद्योजकांना व्यवसायासाठी उद्योग, उत्पादन, विक्री, विपणन या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक कर्तव्याची जबाबदारी घेत महासंघाने कोल्हापुरातील एक गाव दत्तक घेतले आहे. ब्रह्मकेसरीच्या माध्यमातून समाजात विविध जिल्ह्यात राबविण्यात येणारे उपक्रम प्रसिद्ध केले जातात. सामाजिक समन्वय साधत समाजाचे सक्षमीकरण करण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ काम करीत आहे. स्वागत दिलीप कुलकर्णी, सुत्रसंचालन महेश बरसावडे, आभार सुहास पोफळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.