Chakan : भामा आसखेड धरण भरले शंभर टक्के

धरणातून ५५३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग 

 एमपीसी न्यूज – तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील व या तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पाऊस झाल्याने भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले आहे.  त्यामुळे या धरणातून ५५३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग भामा नदीपात्रात होत असल्याची माहिती भामा आसखेड सिंचन प्रकल्प व्यवस्थापन उपविभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.   
भामा आसखेड धरण पूर्णं क्षमतेने भरल्याने नदीकाठच्या नागरिकांना धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भामा आसखेड धरण परिसरात शिवे, वहागाव, देशमुखवाडी, कोळीये, गडद, वांद्रा व पाईट या गावांसह अनेक छोट्या वाड्या व वस्त्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात पावसाचा कायम जोर असल्याने या धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के भरले असल्याने या धरणातून ५५३ क्युसेकने पाणी भामा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे भामा नदीवरील पूर्व भागातील काळूस व भोसे या गावांचा पूल पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पुलावरून ये जा करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर वाढत राहिल्यास भामा आसखेड धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच असल्याने पुणे – नाशिक महामार्गावरील भीमा, भामा नद्या तसेच रोहकल बंधारा तुडुंब भरला असून, या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या भागातील काही शेतकऱ्यांनी यामुळे पुढील गणिते आखण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.