Bhama Askhed News : सहा वर्षे सुरू असलेल्या योजनेचे एका वर्षात श्रेय घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद : जगदिश मुळीक यांची टीका

एमपीसी न्यूज : भामा-आसखेड प्रकल्प पूर्णत्वास येत असताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या वडगावशेरीच्या विद्यमान आमदारांनी या प्रकल्पासाठी शून्य निधीची तरतूद केली होती. मुळात सहा वर्षे सुरू असलेल्या योजनेचे एका वर्षात श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न विद्यमान आमदार करीत आहेत, अशी टीका शहर भाजपचे अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी 95 टक्के काम पूर्ण झाले होते. आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करून, बैठका घेऊन या योजनेला गती दिली. स्थायी समितीचा अध्यक्ष असताना मी सुमारे 185 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्त गावांमध्ये विकासकामे झाली. काही प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी 15 लाख रुपये देऊन त्यांनी पुनर्वसन करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. बहुतांश निधी भाजप सत्तेत आल्यानंतरच उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाला गती प्राप्त झाली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांना जमिनीपोटी जमिनच घ्यावी अशी चिथावणी दिली. त्यांना न्यायालयात जाण्यास उद्युक्त केले. यामुळे योजनेचे काम वारंवार बंद पाडले. त्यामुळे 100 कोटी रुपयांनी खर्च वाढला. पुणेकरांना पाणी मिळू देणार नाही, अशा धमक्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांनी दिल्या होत्या. आता मात्र श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहा वर्षे सुरू असलेल्या योजनेचे एका वर्षात श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न विद्यमान आमदार करीत आहेत.

परंतु ते नगरसेवक असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मधील या योजनेअंतर्गत 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. टाकीचे बांधकाम करण्यासाठी आणलेले साहित्य चोरीला गेले आहे. टाकीचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी नगरसेवक आणि आमदार या नात्याने त्यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. त्यातून त्यांची निष्क्रीयता लक्षात येते, असा टोमणाही मारला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like