Bhandara News : जीव गेल्यानंतर ऑडिट म्हणजे वराती मागून घोडे -ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची चौकशी करण्यासोबतच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीनं ऑडीट करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ‘जीव गेल्यानंतर ऑडिट करणे म्हणजे वराती मागून घोडे’ असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केली आहे.

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रुग्णालयातील अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनं संबंध महाराष्ट्र हळहळला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी याची दखल देत घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र सरकारवर निशाणा साधत टिका केली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी ट्वीट करुन सरकारवर निशाणा साधला आहे. ,’ एखादी घटना घडल्यानंतर, जीव गेल्यानंतर ऑडिट करणे म्हणजे वराती मागून घोडे! शासकीय इमारती असो, ब्रिज असो, वर्षानुवर्षे यांचे ऑडिट का होत नाही? वारंवार निवडून येणाऱ्या प्रतिनिधींना महाराष्ट्र हे प्रश्न विचारत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकरणी आज सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.