Pune : भानुप्रताप बर्गे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

शहराच्या सुरक्षिततेत योगदान देणा-यांचा ‘सूरक्षित पुणे पुरस्कार - २०२०’ देत सन्मान

एमपीसी न्यूज – शहराच्या सुरक्षिततेसाठी योगदान देत उल्लेखनीय कामगिरी करणा-या पोलीस, वाहतूक, अग्निशमन आणि सिक्युरिटी प्रोफेशनल्स क्षेत्रात काम करणा-यांचा सत्कार आज पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्सच्या वतीने करण्यात आला. यावेळी पुणे पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देत गौरविण्यात आले. कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टीन येथे झालेल्या एका कार्यक्रमात पुणे पोलीस दलाचे सहआयुक्त रवींद्र शिसवे आणि पुणे पोलीस दलाचे उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्सचे सदस्य मंगेश काटे, लॉईड्स दास, शेखर मेहता, सुनील बिडलाम आदी यावेळी उपस्थित होते. जीवनगौरव पुरस्काराबरोबरच यावेळी शहराच्या सुरक्षिततेसाठी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस, वाहतूक, अग्निशमन आणि प्रायव्हेट सुरक्षा क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींना देखील यावेळी पुरस्कार देत गौरविण्यात आले. रवींद्र शिसवे आणि बच्चन सिंग यांच्या हस्ते यावेळी छाया गुजर (पोलीस सहनिरीक्षक), वर्षा अॅन्थनी (हेड कॉन्स्टेबल- वाहतूक), सुनील कुलकर्णी (उपनिरीक्षक), गणेश थोपटे (कॉन्स्टेबल- वाहतूक), श्रीकांत कुरकेली (पोलीस नायक), जितेंद्र कोळी (पोलीस निरीक्षक), सतीश जगताप (अग्निशमन दल), गिरीश बिदानी (एचएसबीसी), परिमल फुलसुंगे (युबीएस, पुणे) यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना रवींद्र शिसवे म्हणाले, “कोणत्याही शहराची सुरक्षा करणे ही पोलीस दलाची जबाबदारी आहे. मात्र, हे असताना पोलीस दलाचे मर्यादित बळ लक्षात घेत सुरक्षाक्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर तज्ज्ञ प्रोफेशनल्सची मदत घेणे आज गरजेचे आहे. आम्हा दोघांचेही ध्येय हे शहराची सुरक्षा हेच असून त्यामध्ये एकमेकांना मदतीचा हात देणे आज गरजेचे आहे. याबरोबरच तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण या सुरक्षितत पुणे, सुरक्षित समाजाच्या दिशेने नक्कीच पाऊले टाकू शकू.”

यावेळी बच्चन सिंग यांनी पुणे पोलीस दल करीत असलेल्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स ही शहरातील सुरक्षिततेच्या क्षेत्रात काम करणा-या संस्थांची शिखर संस्था असून त्यांचे सुमारे २०० हून अधिक सदस्य आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.