Pimpri News : शेतकरी, कामगार कायद्याविरोधात पिंपरीत सोमवारी ‘भारत बंद जन आक्रोश आंदोलन’

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगार कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पिंपरीत सोमवारी (दि.27) ‘भारत बंद जन आक्रोश आंदोलन’ केले जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाविकास आघाडी यांच्या वतीने भारत बंद जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी पिंपरीत आज (शनिवारी, दि.25) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक मारुती भापकर, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, कामगार नेते अनिल रोहम, पांडूरंग गडेकर, दिलीप पवार, निरज कडू, वसंत पवार आदी उपस्थित होते.

‘जन आक्रोश आंदोलन हे फक्त शेतकरी आणि कामगारांचे नसून समाजातील सर्व घटकांचे प्रातिनिधिक आंदोलन आहे. ‘एफडीआय’ ला रेडकार्पेट म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या गुलामगिरीत ढकलण्याची पायाभरणी आहे. शेतकरी आणि कामगारांच्या हिताविरुध्द केलेल्या या काळ्या कायद्यांमुळे भारतात पुन्हा ‘ईस्ट इंडीया कंपनी’ चा उदय होईल. ओला, ऊबर मुळे रिक्षावाले, टॅक्सीवाले जसे आर्थिक कोंडीत सापडले आहेत, तशीच परिस्थिती आगामी काळात सर्व उद्योग, व्यवसायांवर येईल. म्हणून हे काळे कायदे रद्द झालेच पाहिजेत. या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे,’ असे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी मत मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.