Bharat Bandh: व्यापाऱ्यांचा आज भारत बंद

एमपीसी न्यूज : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ अर्थात ‘कॅट’ने जीएसटीच्या नियमांच्या समीक्षेची मागणी करत शुक्रवारी भारत बंदचे आवाहन केले आहे. तसेच, देशातील वाहतूक आणि मजूर संघटनांनी सुद्धा डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतींविरोधात आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे.

या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने  शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी रद्द कराव्या, फूड सेफ्टी ॲक्टमधील तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी. तसेच टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये. या मागण्यांसाठी आज भारतातील अनेक व्यापारी संघटनांनी एक दिवसीय राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंदची घोषणा केली आहे.

या बंदमध्ये लाखो व्यापारी व दुकानदार सहभागी होणार आहेत. या बंदमुळे किराणा व्यापार, माल वाहतूक, मसाले बाजार, भांडी बाजार, सौंदर्य प्रसाधने, मोबाइल व संगणक विक्री या सर्व क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. मुंबईतील अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, या बंदमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजदेखील सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.