Lonavala : ‘विश्वासात घेतले जात नसल्याने केले विरोधात मतदान’; नगरसेवक भरत हारपुडे, गौरी मावकर, जयश्री आहेर यांचा खुलासा

 

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपा गटातील प्रमुख मंडळी आम्हाला विश्वासात घेत नसल्याने आम्ही विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत दोन जण गैरहजर राहिलो तर एकाने विरोधी मतदान केले असल्याचा खुलासा नगरसेवक भरत हारपुडे, गौरी मावकर व जयश्री आहेर यांनी पत्रकार परिषदेत केला.

आम्ही आर्थिक देवाणघेवाण करुन विरोधी भूमिका घेतली हा आरोप खोटा असून प्रभारी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगराध्यक्षा सुरेखा जाधव व गटनेते देविदास कडू यांच्या विरोधात मतदान केले असल्याचे हारपुडे यांनी सांगितले. गौरी मावकर म्हणाल्या आमच्यावर केलेले आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप संबंधितांनी सिध्द करावेत अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा आम्ही तिघेजण दाखल करणार आहोत.

_MPC_DIR_MPU_II

विषय समिती सभापती निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक भरत हारपुडे व जयश्री आहेर हे गैरहजर राहिले व गौरी मावकर यांनी सत्ताधार्‍यांच्या विरोधात मतदान केल्याने भाजपा व सहयोगी पक्ष असलेला रिपाई व काँग्रेस यांना सभापती पदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी भूमिका घेणार्‍या नगरसेवकांवर शिस्तभंगाची तसेच नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करणार असल्याची भूमिका सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, रामविलास खंडेलवाल व देविदास कडू यांनी पत्रकार परिषदेत मांडली होती.

याच्या विरोधात हारपुडे, मावकर व आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विरोधात मतदान करणे अथवा गैरहजर राहण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सत्ताधारी भाजपा सभागृहात इतर सदस्यांना दुय्यम व अपमानास्पद वागणूक देतात, त्यांच्या मनासारखे न वागल्यास व्यवसाय व घरांवर कारवाईची भाषा करतात, मित्रपक्ष व सहयोगी सदस्य यांना विश्वासात न घेता त्यांच्या मनाप्रमाणे कारभार करण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही विरोधी भूमिका घेतली. वरील तिन्ही व्यक्तींमुळे भाजपा संघटनेमध्ये दोन गट पडले असून त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान झालेले असल्याने त्यांनाच पक्षातून कायमचे काढण्यात यावे अशी मागणी श्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले.

जयश्री आहेर म्हणाल्या, ” नवनिर्वाचित भाजपा अध्यक्ष पक्ष संघटना वाढविण्याकरिता झाले आहेत की नगरसेवकांना निलंबित करण्याकरिता याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. भाजपाच्या पक्षांतर्गत वादाचा फटका कारण नसताना आरपीआय व काँग्रेस पक्षाला बसला, भाजपाच्या तीन नगरसेवकांनी विरोधी भूमिका घेतल्याने आरपीआयचे दिलीप दामोदरे व काँग्रेसचे सुधीर शिर्के यांना सभापतीदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.