Pune News : कै.बाबुराव सणस कन्याशाळेत सुरू होणार भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय !

0

एमपीसी न्यूज : आरोग्य विद्यापीठ नाशिककडून भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळविण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, नायडू साांसर्गिक रुग्णालयाच्या २० एकरवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामास परवानगी स्थायी समितीकडून देण्यात आली आहे. परंतु तात्पुरत्या स्वरुपात मंगळवार पेठेतील कै.बाबुराव सणस कन्याशाळेच्या वर्गखोल्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली. 

मंगळवार पेठेतील सणस महाविद्यालयाच्या इमारतीमधील वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या नुतनीकरणाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यासाठी १ कोटी २३ लाख रुपयांच्या कामाला मान्यता दिली असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू होते. त्यासाठी अंदाजपत्रकात 500 कोटी रुपयांची विशेष तरतूद देखील करण्यात आली आहे.

राज्यशासनाकडून वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाल्यानंतर स्वतंत्र ट्रस्टच्या माध्यमातून महाविद्यालय उभारणीला सुरवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. सणस कन्याशाळेसोबतच नजिकच्या कमला नेहरू रुग्णालयातील जागाही वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष रासने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.