Pune : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा – हनुमंत साठे

रिपब्लिकन पक्षातर्फे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कराने सन्मानित करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

येत्या गुरुवारी (दि. 1 ऑगस्ट) अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी व जन्मशताब्दी वर्षात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हनुमंत साठे बोलत होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे उपस्थित होते.

हनुमंत साठे म्हणाले, “अण्णाभाऊंनी समाजसुधारणेसाठी केलेले कार्य मोठे आहे. समाजाचा ते मानबिंदू आहेत. आपल्या साहित्यातून, शाहिरीतून त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. अशा अण्णाभाऊंचा जन्मशताब्दी वर्षात यथोचित सन्मान व्हायला हवा. राज्यात साधारण 80 टक्के मातंग समाजाकडे मालकीच्या जमिनी नाहीत. शासनाने प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन द्यावी. त्याच्या मशागतीसाठी आवश्यक निधी द्यावा, अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे कर्जपुरवठा करण्यासाठी 500 कोटी रुपये कर्जनिधी देण्यात यावा. मातंग समाजातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महामंडळाचे मागील थकीत कर्ज माफ करण्यात यावे. शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर वेळप्रसंगी आंदोलनाचा मार्गही अवलंबिला जाईल.”

अशोक कांबळे म्हणाले, “जन्मशताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ दुपारी 1 वाजता भव्य अभिवादन सभा होणार आहे. हे जन्मशताब्दी वर्ष रिपब्लिकन पक्षाकडून सामाजिक परिवर्तनाचे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यासाठी पक्षातील 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधून अण्णाभाऊंची जन्मशताब्दी साजरी करावी व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे पत्र पक्षाने महापौरांना दिले आहे. विद्यार्थ्यांना अण्णाभाऊंचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शहर पातळीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक महिन्याला कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये परिसंवाद, व्याख्याने, पुरस्कार, साहित्याचे प्रदर्शन, मोफत व माफक दरात पुस्तक वाटप आदी कार्यक्रम असणार आहेत.

परशुराम वाडेकर म्हणाले, “शहराच्या विविध शाखांमधून अण्णाभाऊ जयंतीचे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. जन्मशताब्दीचा समारोप लक्ष्मी रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढून होणार आहे. राज्य सरकारने अण्णाभाऊ जन्मशताब्दीसाठी शंभर कोटी खर्चास मान्यता दिली आहे. त्याच्या योग्य विनियोगासाठी मुख्यमंत्र्यांशी समन्वय सुरु आहे.’ संजय सोनावणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.