Pune : गायीच्या तुपामध्ये भेसळ करणाऱ्या गोडाऊनवर छापा, 412 किलो तुप जप्त

एमपीसी न्यूज – गायीच्या तुपामध्ये भेसळ करणाऱ्या इसमास भारती विदयापीठ पोलिसांनी सापळा रचुन बुधवारी (दि 24) रात्री आठच्या सुमारास कात्रज चौकात अटक करुन 15 किलो भेसळयुक्त तुप जप्त केले.

तसेच त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन गंगाधाम चौकातील भेसळ करणाऱ्या गोडाऊनवर छापा टाकुन तेथून 412 किलो वजनाचे तुप जप्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन मधील पोलीस शिपाई गणेश चिंचकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून भेसळयुक्त तुपाची विक्री करण्यासाठी एक इसम कात्रज चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन संशयितास पकडण्यासाठी भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरे, तपासपथक व दोन पंच यांनी सापळा रचला. कात्रज चौकात रात्री आठच्या सुमारास संशयित केशरसिंग मानसिंग राठोड (वय 40, अप्पर इंदीरानगर, पुणे) याला 15 किलो वजनाच्या खादयतुपाच्या डब्यासह ताब्यात घेतले.

राठोड यांनी सांगितलेल्या गंगाधाम चौकातील गोडाऊनवर कारवाई करण्यासाठी भारती विदयापीठ पोलीस पथक, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी छापा टाकला असता त्यांना गोडाऊनमध्ये संशयित भेसळ असलेले गायीच्या खाद्यतुपाचे 25 डबे,60 किलोचे पिवळ्या रंगाच्या तुपाचे डबे सापडले. तसेच वजनकाटा व भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य तेथे सापडले. दोन पंचाच्या समोर पंचनामा करुन बेकायदेशिर गोडाऊन सिलबंद करण्यात आले. तसेच 412 किलो वजनाचे तुप व 15 हजार 60 रुपयांचा माल जप्त केला आहे. भेसळयुक्त मालाचे नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच पुढील कायदेशिर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कामगिरी, पोलीस उपआयुक्त बच्चनसिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हणे,सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरे व तपासपथकातील चंद्रकांत फडतरे, कृष्णा बढे,सर्फराज देशमुख,राहुल तांबे, कुंदन शिंदे, अभिजीत रत्नपारखी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.