Akurdi : ‘इव्हीएम’विरोधात भारिपचे घंटानाद आंदोलन 

एमपीसी न्यूज – इव्हीएम बंदीच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज (सोमवारी) आकुर्डीतील तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी इव्हीएम हटाव देश बचाव अशा  घोषणा देण्यात आल्या. तसेच आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. 

आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी (दि.17) घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भारिपच्या महिला शहराध्यक्षा लता रोकडे, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, माजी शहराध्यक्ष अंकुश कानडी, माजी नगरसेवक रामचंद्र माने, के.डी. वाघमारे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, बाळासाहेब बरगले, राहुल इनकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. या पुढील सर्व सार्वत्रिक निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार गीता गायकवाड यांना भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात मोठी तफावत असून इव्हीएम मॅनेज करून भाजप निवडणुका जिंकत आहे. निवडणूक आयोग भाजप सरकारच्या इशा-यावर चालत असल्याचा आरोप तायडे यांनी केला. झोपलेले शासन व प्रशासन जागे करण्यासाठी हा लढा उभारला असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.