GramPanchayat Election : पाटोद्यात भास्कर पेरे पाटलांना मोठा धक्का, मुलीचा पराभव

दुर्गेश खोकड यांना 204 मतं मिळाली, तर अनुराधा पेरे पाटील यांना 184 मतं

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत असून, औरंगाबादेतील आदर्श गाव असलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीची निकाल हाती आले असून, या निवडणुकीतून भास्कर पेरे पाटील यांनी माघार घेतली होती, तर त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती.

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या आदर्श ग्राम पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. महाराष्ट्रभरात गावाला ओळख देणारे विकास पुरुष भास्कर पेरे-पाटील यांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. भास्कर पेरे-पाटील यांचा तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.

त्यामुळे अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.

अनुराधा पेरे-पाटील यांच्याविरोधात उभे असलेल्या दुर्गेश खोकड यांना 204 मतं मिळाली, तर अनुराधा पेरे पाटील यांना 184 मतं मिळाली. पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या पेरे-पाटील यांनी पाटोदा गावाचं रूपडं बदललं, गावाला आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळख दिली. त्यात गावात त्यांच्या मुलीचा मात्र पराभव झाला आहे. या पराभवामुळे भास्कर पेरे-पाटील यांना देखील गावात पराभव होण्याची कुणकुण लागली होती का? त्यामुळे त्यांनी माघार घेतली अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.