Bhatghar Dam Drowning Case Update : दुर्दैवी घटना! बुडणाऱ्या एकीला वाचवण्यासाठी चौघी पाण्यात उतरल्या आणि सगळ्याच पाहता पाहता बुडाल्या

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणात बुडून गुरुवारी सायंकाळी पाच तरूणींचा मृत्यू झाला. या पाचही तरुणींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून सह्याद्री रेस्क्यू टीम, भोईराज जलआपत्ती पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यांना शोधण्यात यश आले आहे. पाचही तरुणी या पुणे शहरातील आहेत. भाटगर धरण परिसरात राहणाऱ्या एका नातेवाईकाकडे त्या आल्या होत्या. संध्याकाळच्या वेळी फिरण्यासाठी या पाचही तरूणी धरण परिसरात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. 

खुशबू लंकेश राजपूत ( वय 19, बावधान पुणे), मनीषा लखन बीनावत (वय 20, हडपसर पुणे), चांदणी शक्ती बीनावत (वय 21, हडपसर पुणे), पुनम संदीप बीनावत (वय 22, हडपसर) आणि प्रतिभा रोहित चव्हाण (वय 23, नऱ्हे पुणे) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच तरुणी आणि नऊ वर्षांची मुलगी अशा सहा जणी भाटघर धरण परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास भाटघर धरणाच्या शेजारी पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी चांदणी बीनावत या तरूणीचा फोटो काढत असताना तिचा पाय पाण्यात गेला आणि ती बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी इतर चार तरुणी सुद्धा पाण्यात उतरल्या आणि पाहता पाहता त्या देखील बुडाल्या. त्यापैकी नऊ वर्षांची मुलगी काठावरच थांबल्याने ती बचावली. तिनेच अखेर घरच्यांना फोन करून याविषयी माहिती दिली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

दरम्यान गुरुवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होतं. पाच पैकी तिघींचे मृतदेह गुरुवारीच हाती लागले होते, तर रात्री उशीरा इतर दोन तरुणींचे मृतदेह हाती लागले आहेत. स्थानिक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.