Bhigwan Crime News : भावाला राखी बांधायला जाऊ का ?, असे विचारले म्हणून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न

भिगवण येथील प्रकार; पती, सासू, सास-यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेने राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाला राखी बांधायला जाऊ का, असे विचारल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला तोंड दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार इंदापूर तालुक्यातील अकोले गावात घडला. याप्रकरणी पती, सासू आणि सासरा या तिघांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरच्या लोकांनी आरोपी पतीला व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपये दिले होते. ते पैसे परत मागितल्याचा राग देखील आरोपींच्या मनात होता, असेही पोलीस तपासात समोर आले आहे.

पती संदीप मधुकर दराडे, सासू सुलोचना मधुकर दराडे, सासरा मधुकर रामहरी दराडे (सर्व रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती संदीप यांचा 1 मे 2016 रोजी विवाह झाला. विवाहाच्या वेळी विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये हुंडा दिला होता.

आरोपी संदीप प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून नोकरी करत आहे. लग्नानंतर वर्षभर फिर्यादी आणि संदीप यांचा संसार सुखाचा झाला.

सन 2017 साली आरोपी संदीप, त्यांचा मित्र अतुल दराडे आणि फिर्यादी महिलेची आई यांनी मिळून वर्धा- कुर्डूवाडी येथे रस्त्यावर खडी टाकण्याचे काम घेतले. त्यावेळी फिर्यादी यांच्या आईने आरोपी संदीप याला पाच लाख रुपये दिले होते.

एक वर्षानंतर त्यांनी उसने दिलेले पैसे परत मागितले. या कारणावरून आरोपी संदीप याने फिर्यादी महिलेला मारहाण करण्यास तसेच आरोपी सासू सासरे यांनी फिर्यादी यांना उपाशीपोटी ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

हा प्रकार विवाहितेने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी अकोले येथे घरगुती बैठक घेऊन सामोपचाराने राहण्याचा तोडगा काढला. काही दिवस व्यवस्थित गेले.

दरम्यान, 3 ऑगस्ट 2020 रोजी विवाहितेने भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जाऊ का, असे पती संदीप याला विचारले. त्यावरून संदीपने विवाहितेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

रात्री फिर्यादी विवाहिता झोपेत असताना आरोपी संदीप याने उशीने तोंड फिर्यादी यांना दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत विवाहितेने सुरुवातीला नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिगवण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.