Bhima Koregaon News : भिमाकोरेगाव विजय स्तंभाला घरातूनच अभिवादन करा -राहुल डंबाळे

एमपीसीन्यूज : दरवर्षी अत्यंत उत्सवाने व उच्चांकी गर्दीत साजरा होणारा १ जानेवारीचा भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर यंदा घरातूनच साजरा करण्याचे अवाहन भिमाकोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे यानी राज्यातील देशभरातील आंबेडकरी अनुयायांना केलेले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुणे परिसरात आहे. पुणे परिसरात तब्बल 14 हजार पेक्षा जास्त ॲक्टिव कोरोना रुग्ण आहेत. तसेच वैदयकिय क्षेत्रातील तज्ञांनी डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे.

त्यामुळे पुणे जिल्हा परिसरातील सर्व प्रकारच्या गर्दीने साजऱ्या होणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ज्यामध्ये जेजुरी येथील सोमवती अमावस्या व आळंदी येथील कार्तिकी यात्रा, तसेच इतर ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.

भिमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर व महापरिर्वाण दिन चैत्यभुमी प्रमाणे आंबेडकरी अनुयायांनी भिमाकोरेगाव लढ्यातील शुरविरांना घरुनच अभिवादन करुन भिमाकोरेगाव येथे येण्याचे टाळावे, असे अवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

समितीच्या व आयोजक कार्यकर्ते, पक्ष संघटना यांच्या समवेत पुणे जिला महसूल व पोलीस प्रशासनाने 10 ऑक्टोबर व 9 डिसेंबर रोजी दोनदा बैठका घेतल्या. यावेळी जवळपास सर्वानुमते यंदाचा उत्सव हा केवळ अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तसेच यंदाच्या वर्षी 1 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सभांना, जाहिर कार्यकमांना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत नसल्याचे सुतोवाच करण्यात आलेले आहे.

तसेच प्रमुख राजकिय पक्ष व सामाजिक संघटना यांनी देखील यावेळी नागरिकांनी याठिकाणी येण्याचे टाळून आपली काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.

दरम्यान, समितीच्या वतीने तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वतत्ररित्या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विविध समाज माध्यमे व ऑनलाईन पोर्टल मार्फत तसेच दुरदर्शन व इतर वाहीन्यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना वेळोवेळी माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी यंदाच्या वर्षी देखील 7820966966 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

समस्त आंबेडकरी समुदायाने ‘माझा समाज माझी जवाबदारी’ या अन्वये भिमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर व महापरिवर्वाणदिन चैत्यभूमी अभिवादनाप्रामणेच भिमाकोरेगावचे देखील अभिवादन घरच्या घरी करून एक आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा समितीच्या वतीने राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.