Pune : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या ; आरपीआय (आठवले गट) ची मागणी

एमपीसी न्यूज – भीमा कोरेगाव येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीनंतर, झालेल्या आंदोलनात दाखल केलेले सहा हजारांहून अधिकचे गुन्हे मागे घ्यावेत. पण, ज्यांनी दंगल घडवून आणली, त्यांच्यावरील गुन्हे कदापिही मागे घेऊ नयेत़, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आफॅ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने करण्यात आली.

भीमा कोरेगाव येथील स्तंभ परिसराच्या विकास आराखड्यास तात्काळ मंजूरी देऊन, भविष्यात येणारा जनसमुदाय लक्षात घेता स्तंभ परिसरातील १०० एकर जागेवर आरक्षण टाकावे, अशीही पक्षाच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत मागणी केली. यावेळी आयुब शेख, जानराव बाळासाहेब उपस्थित होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत व दंगल घडविणाऱ्यांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

गेल्यावर्षी विजयस्तंभावर अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या त्रुटी यावर्षी होणार नाही याकरिता खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबई-तळेगाव चाकणमार्गे भीमा कोरेगावकडे येणारी वाहतूक सेवा बंद केली जाणार नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. भीमा कोरेगावकडे येणारे कोणतेच रस्ते बंद केले जाणार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले येणार आहेत. यानंतर जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.